२०२२च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा ‘आदित्योदय’

आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली विजयश्री खेचून आणत महापालिकेवर भगवा फडकवण्याचा निर्धार पक्षाने केला आहे.

103

शिवसेना नेते, युवा सेना अध्यक्ष तथा राज्याचे पर्यावरणमंत्री, पालकमंत्री आदित्य ठाकरे येत्या फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करताना दिसणार आहेत. २०१७ची सार्वत्रिक निवडणूक आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचा शिवसेनेचा विचार होता. परंतु भाजपशी फारकत घेतल्याने तसेच राजकारणातील कमी अनुभव लक्षात घेता शिवसेनेने तेव्हा एक पाऊल मागे टाकले. परंतु आता आदित्य ठाकरे यांनी मुंबईवर पूर्ण लक्ष केंद्रीत केले असून, उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी असल्याने आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवून त्यांचे नेतृत्व पक्षाला दिले जाणार आहे. त्यामुळे पक्षाची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपविण्यात येणार आहे.

नेतृत्व सिध्द करण्याची संधी

मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात असताना, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाच्या भूमिकेत आहेत. मुख्यमंत्री बनल्यानंतर संकटांचा सामना करत राज्याचा कारभार पुढे नेण्याचा प्रयत्न उध्दव ठाकरे करत आहेत. परंतु राज्याच्या कारभारात व्यस्त झालेल्या मुख्यमंत्र्यांना आता पक्षाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे पक्षाचे नेतृत्व आता युवा सेनेचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर सोपवण्यात येणार आहे. २०१७च्या निवडणुकीच्या तुलनेत आदित्य ठाकरे हे आता राजकीय परिपक्व झालेले आहेत. राज्याचे मंत्रीपद भूषवत त्यांनी राज्याच्या कारभारातही लक्ष घातले आहे. त्यामुळे पक्षाचे नेतृत्व त्यांच्याकडे सोपवून त्यांना गुणवत्ता सिध्द करण्याची संधी दिली जाणार आहे.

इच्छुकांची खेचाखेची सुरू

हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणून उध्दव ठाकरे यांनी पक्षाची जबाबदारी घेत, १९९७ची महापालिका आपल्या नेतृत्वाखाली निवडून शिवसेनेचे ११० नगरसेवक निवडून आणले होते. महापालिकेतील आजवरच्या निवडणुकीच्या तुलनेत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक त्यावेळी निवडून आले होते. यामधून उध्दव ठाकरे यांचे नेतृत्व उदयास आले. त्याचप्रमाणे २०२२च्या सार्वत्रिक निवडणुकीत आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व उदयास आणण्याचा विचार आहे. यासाठी भाजपसह इतर पक्षांमधील निवडून येणाऱ्या नगरसेवकांना तसेच इच्छुक उमेदवारांना आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला सोबत घेऊन पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली विजयश्री खेचून आणत महापालिकेवर भगवा फडकवण्याचा निर्धारही पक्षाने केला आहे.

आदित्य करत आहेत जीवाची मुंबई

उध्दव ठाकरे यांना त्यावेळी त्यांचे स्वीय सहाय्यक आणि विद्यमान शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मदत केली होती. तर आदित्य ठाकरे यांच्या सोबतीला पक्षाचे सचिव व त्यांचे सहाय्यक सुरज चव्हाण आणि युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई आहेत. त्यामुळे या दोघांसह आदित्य ठाकरे यांनी आतापासून मुंबई पिंजून काढण्यास सुरुवात केली असून, वरळीसह मुंबईतील महापालिकेच्यावतीने तसेच पक्षाच्यावतीने रावबल्या जाणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमांना ते आवर्जुन हजेरी लावत आहेत. तसेच महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना निर्देश देत मुंबईतील विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आदित्य ठाकरेंच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करण्यावरही आयुक्तांनी अधिक भर दिला असून, त्यासाठी ते संबंधित अधिकाऱ्यांना काटेकोरपणे अंमलबजावणी करायला भागही पाडत आहेत.

…तर मोठी जबाबदारी मिळणार

एका बाजूला आदित्य ठाकरे हे राज्याचे मंत्री असले तरी ते मुंबईतच कायम असल्याने, त्यांनी आपले मनसुबेही जाहीर केले आहेत. त्यामुळे आता बाबांप्रमाणेच आदित्य ठाकरे मुंबईत नगरसेवकांचा आकडा ११०हून अधिक निवडून आणत आपले पक्षातील नेतृत्व सिध्द करतात का, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. जर २०२२च्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी मोठे यश मिळवल्यास लवकरच पक्षाची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकली जाणार असून, पक्षाचे एक नेतृत्व राज्याला दिले जाणार आहे. पक्षाचे नेता ते राजकीय नेता अशी त्यांची वेगळी ओळख यामधून निर्माण केली जाणार असल्याचेही बोलले जात आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.