शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करतील, या माझ्या वक्तव्यात काही गैर नाही, त्यात पवारांचा सहभाग असेल. शरद पवार हे विरोधकांची मोट बांधत आहेत, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे काही वेगळे नाहीत. ते दोघेही एकच आहेत. त्यांनी एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन केले आहे. केंद्राचा जेव्हा विषय येतो, तेव्हा पवार बोलतात आणि राज्याच्या विषयात मुख्यमंत्री ठाकरे बोलतात, असे विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले.
मनसेला केंद्राकडून महागाई भत्ता मिळतो!
वाढत्या महागाईच्या विरोधात शिवसेना औरंगाबाद येथे शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढणार आहे. त्याआधी राऊत माध्यमांशी बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला वाढती महागाई दिसत नाही, हे दुःख आहे. कदाचित त्यांना केंद्राकडून महागाई भत्ता मिळत असेल, म्हणून ते महागाईच्या विरोधात बोलत नाही, असा टोला राऊत यांनी लगावला.
(हेही वाचा : त्रिपुराप्रकरणी हिंसाचारानंतर राज्यात तणावपूर्ण शांतता! सरकारला उशिरा आली जाग)
एसटी विलीनीकरणात तांत्रिक अडचणी
एसटीचे विलीनीकरण करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे ते लगेच होणे शक्य नाही, परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच मागण्या मान्य केलेल्या आहेत. त्यामुळे विलीनीकरणावर त्यांनाच अधिक माहिती आहे, असेही राऊत म्हणाले.
अनिल देशमुखांना रुग्णालयात हलवावे
सध्या अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करणे आवश्यक आहे, ते राज्याचे गृहमंत्री होते. त्यांच्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत. कारण आरोप करणारा पळून गेला आहे आणि त्याने स्वतः सांगितले आहे की, त्याच्याकडे यासंबंधी पुरावे नाहीत. आमच्याकडे भाजपच्या लोकांची भ्रष्टाचाराची प्रकरणे आहेत. त्यांचे पत्ते ईडीला माहित नसावेत, आम्ही ईडीच्या कार्यालयात जाऊन त्याची माहिती देणार आहोत, असेही राऊत म्हणाले.
Join Our WhatsApp Community