Vidhan Parishad Election मधून शिवसेनेची माघार; कोण कुणाच्या विरोधात लढणार?

222
Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या चार जागांसाठी बुधवारी मतदान

लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या दबावामुळे उमेदवार बदलणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आता विधान परिषद निवडणुकीत माघार घ्यावी लागली आहे. या उमेदवारी माघारीमुळे शिवसेनेत नाराजी आहे. शिवसेनेने विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतली असली तरी महायुतीचा घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई शिक्षक मतदारसंघातील आपला उमेदवार कायम ठेवला आहे. त्यामुळे मुंबई शिक्षक मतदारांसघात महायुती आमने-सामने आहे. (Vidhan Parishad Election)

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक विभागीय शिक्षक या चार जागांच्या निवडणुकीसाठी येत्या २६ जूनला मतदान होत आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवारी (१२ जून) संपली. माघारीमुळे विधान परिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून मुंबई पदवीधरमध्ये शिवसेना उबाठा गट विरुद्ध भाजपा अशी मुख्य लढत होईल. तर मुंबई शिक्षकांमध्ये उबाठा गट, अजित पवार गट, भाजपा आणि समाजवादी गणराज्य पक्ष अशी चौरंगी लढत होईल. कोकण पदवीधरमध्ये भाजपा विरुद्ध काँग्रेस तर नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना, अजित पवार गट आणि महायुती अशी तिरंगी लढत होणार आहे. (Vidhan Parishad Election)

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाने परस्पर उमेदवार घोषित केल्याने शिवसेनेनेही आपले उमेदवार रिंगणात उतरविले होते. शिवसेना पक्ष महायुतीत मुंबई पदवीधरच्या जागेसाठी विशेष आग्रही होता. त्यासाठी शिवसेनेने याआधी मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेल्या माजी मंत्री दीपक सावंत यांना उमेदवारी दिली होती. मात्र, भाजपाने आपला आग्रह कायम ठेवल्याने शिवसेनेला सावंत यांचा अर्ज मागे घ्यावा लागला. तर कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपाचे निरंजन डावखरे यांच्यासाठी शिवसेनेच्या संजय मोरे यांना माघार घ्यावी लागली. कोकण पदवीधरमधून उबाठा गटाच्या किशोर जैन यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अमित सरैया यांनी माघार घेतल्याने येथे निरंजन डावखरे यांना आता काँग्रेसच्या रमेश कीर यांचे आव्हान आहे. कोकण पदवीधरमधून १२ उमेदवारांनी माघार घेतल्याने येथे आता १३ उमेदवार रिंगणात आहेत. (Vidhan Parishad Election)

(हेही वाचा – विधानसभेला अजितदादांना सहानुभूती मिळेल; Sunil Tatkare यांचा विश्वास)

मुंबई विभागीय शिक्षक मतदारसंघात अजित पवार गटाने शिवाजीराव नलावडे यांची उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे येथे भाजपाचे शिवनाथ दराडे, उद्धव ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर आणि समाजवादी गणराज्य पक्षाचे सुभाष मोरे यांच्यात लढत होईल. मुंबई शिक्षकमधून काँग्रेसच्या प्रकाश सोनवणे यांनी बुधवारी माघार घेतली. नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघातून एकूण १५ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे नाशिकमध्ये महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटाचे संदीप गोपाळराव गुळवे, महायुतीचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे किशोर दराडे आणि अजित पवार गटाचे महेंद्र भावसार या प्रमुख उमेदवारांमध्ये लढत होईल. (Vidhan Parishad Election)

विधान परिषद निवडणूक लढणे हा रणनीतीचा भाग : सुनील तटकरे

दरम्यान, महायुती असतानाही विधान परिषद निवडणूक लढविणे हा आमच्या रणनीतीचा भाग आहे. विधान परिषद निवडणुकीविषयी आमची दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. या चर्चेनंतर मुंबई विभागीय शिक्षक मतदारसंघात आमचा उमेदवार कायम ठेवला आहे. विधान परिषदेला पसंती क्रमानुसार मतदान होते. त्यामुळे रणनीती निश्चित करूनच आम्ही विधान परिषद लढत आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. (Vidhan Parishad Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.