मुंबईत या, नाहीतर कारवाई करू! बंडखोरांना शिवसेनेचे अल्टिमेटम

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील आमदारांच्या गटाने शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यानंतर आता राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण आता याचबाबत शिवसेनेकडून मोठी भूमिका घेण्यात आली आहे. शिवसेनेकडून सर्व बंडखोर आमदारांना पत्र पाठवण्यात आले असून, संध्याकाळपर्यंत मुंबईत परत या अन्यथा तुमच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी सक्त ताकीद या पत्रात देण्यात आली आहे.

काय आहे पत्रात?

शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांच्याकडून आता सर्व बंडखोर आमदारांना पत्र पाठवण्यात आले आहे. पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी 22 जून रोजी संध्याकाळी पाच वाजता वर्षा बंगल्यावर होणा-या बैठकीला आपण उपस्थित राहावे. या बैठकीला वैध कारणे दिल्याशिवाय तुम्हाला गैरहजर राहता येणार नाही, असे या पत्रात म्हटले आहे.

(हेही वाचाः शिवसेना सोडणार? एकनाथ शिंदेंनी स्पष्ट सांगितले)

आमदारांना इशारा

तसेच, या बैठकीला अनुपस्थित राहिल्यास तुमचा स्वेच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडण्याचा इरादा आहे असे मानले जाईल आणि संविधानातील सदस्य अपात्रतेसंदर्भात असलेल्या तरतुदीनुसार आपल्यावर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा या पत्रातून सर्व बंडखोर आमदारांना देण्यात आला आहे. या पत्राची आमदारांनी दखल न घेतल्यास पुन्हा एक पत्र पाठवण्यात येईल. या पत्रालाही त्यांनी प्रतिसाद न दिल्यास त्यांच्यावर अखेर कारवाई होईल, असे सांगण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here