– जयेश शत्रुघ्न मेस्त्री
महाराष्ट्राचं राजकारण (Politics of Maharashtra) एक वेगळं वळण घेतंय. शिवसेना शिंदेंची झाली आणि राष्ट्रवादी अजित पवारांची झाली. शरद पवारांसोबत जे झालं ते होणारच होतं, ते विधीलिखित होतं, असं म्हणता येईल. कारण त्यांना माहित होतं की सुप्रिया सुळे पक्ष सांभाळू शकत नाही. अजित पवार हेच योग्य उमेदवार आहेत. पण त्यांनी निर्णय देखील घेतला नाही. त्यांनी सुप्रिया सुळे यांना ’सायलेंट पक्षप्रमुख’ बनवले. मात्र तशी अधिकृत घोषणा केली नाही. त्यामुळे आधीच साडेतीन जिल्ह्यांपुरता मर्यादेत असलेल्या राष्ट्रवादी या पक्षात फूट पडली आणि अजित दादांनी बाजी मारली.
दुसरीकडे बाळासाहेबांच्या हयातीत उद्धव ठाकरेंकडे प्रमुखपद गेलं होतं. त्यामुळे कार्यकर्ते व इतर नेत्यांनी त्यांना पक्षप्रमुख म्हणून स्वीकारणे भाग होते. त्यात राज ठाकरेंनी आधीच वेगळी चूल मांडली. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा मार्ग मोकळा झाला होता. मोदी लाटेत शिवसेनेला चांगली मते मिळाली. मात्र मुख्यमंत्री होण्याच्या अट्टाहासामुळे ठाकरेंचे अतोनात नुकसान झाले. म्हणून असे म्हणावे लागेल की उद्धव ठाकरे हे सुप्रिया सुळे यांच्यापेक्षा नशीबवान असले तरी त्यांनी स्वतःच्या हातानेच स्वतःचा पक्ष गमावला. आता पवार आणि ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना याविषयी दुःख होणे स्वाभाविक आहे. मात्र ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’ असेही दुःखी लोक पाहायला मिळतात. त्यांच्या दुःखाला श्रद्धांजली वाहून एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणे गरजेचे आहे.
(हेही वाचा – Army Guard : राष्ट्रपतींच्या उपस्थितीत ‘चेंज ओव्हर ऑफ द आर्मी गार्ड’ बटालियन सोहळा )
आता राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा अशी महायुती झाली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला ४००+ जागा हव्या आहेत. तसं भावनिक आणि राजकीय वातावरण सुद्धा निर्माण झालेलं आहे. महाराष्ट्रातील या घडामोडींमुळे हिंदुत्व हा राजकीय अजेंडा स्वीकारलेल्या मनसेची अडचण झाली. युतीत सामील करायचं तर त्यांच्याकडून कोणताच लाभ भाजपाला मिळणार नाही आणि विरोधी गटात जायचं तर हिंदुत्वाचं काय करायचं, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. म्हणून मनसे हा सध्या युतीतला ‘सायलंट साथीदार’ होऊ शकतो.
दादांना भविष्यात युती सोडावी लागणार आहे. कारण महाराष्ट्रात बिहारसारखी परिस्थिती नाही. भाजप कधीही स्वबळावर मुसंडी मारु शकतो. दुसरी गोष्ट नव्या वातावरणात राष्ट्रवादीला नैसर्गिकरित्या जुळवून घेता येणार नाही. मात्र दादांची राष्ट्रवादी भविष्यात विरोधात बसली तरी भाजपानेच त्यांना काकांकडून पक्षाचा अधिकार मिळवून दिला आहे, हा दबाव दादांवर राहील. पुढे शिवसेना-भाजपा ही नैसर्गिक युती टिकून राहण्याची शक्यता अधिक आहे. मात्र काही वर्षे भारतात आणि महाराष्ट्रातही सक्षम विरोधी पक्ष निर्माण होणार नाही आणि याला जबाबदार भाजपविरोधी पक्ष आहेत. कारण हे पक्ष म्हणजे ‘कुटुंब उदरनिर्वाह आणि कल्याण योजना’ अशा प्रकारे काम करतात. या सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कुटुंबाला वाहिलेला पक्ष यापुढे तग धरू शकणार नाही. जोपर्यंत पक्षाच्या अंतर्गत लोकशाही राबवली जात नाही तोपर्यंत ह्यांना लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही आणि तोपर्यंत महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या कल्याणाचं चिंतन करणारा विरोधी पक्ष मिळणार नाही.
महाराष्ट्रात विरोधी पक्षाची धुरा कोण सांभाळणार?
लोकशाहीत जसा एक समर्थ सत्ताधारी पक्ष लागतो, तसा सक्षम विरोधी पक्ष सुद्धा लागतो. २०१४ पूर्वी भाजपाने विरोधी पक्षाची भूमिका उत्तमरीत्या बजावली. सरकारला कोणत्या मुद्द्यांवर धारेवर धरायचे याचे भान भाजपकडे होते. म्हणूनच कोरोना काळात सत्ता नसताना भाजप, संघ या संस्थांनी मोठ्या प्रमाणात सेवा कार्य आरंभून ठाकरे सरकारला तसे सहाय्यच केले होते. इतकी परिपक्वता भाजपा विरोधकांना दाखवता आली नाही. उलट सत्ता मिळाल्यावर ठाकरे सरकारने सत्ता कशी राबवू नये याचा वाईट पायंडा पाडला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community