शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत शिवशक्ती- भीमशक्ती एकत्र येणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. आंबेडकर आणि ठाकरे या दोन्ही नावांना इतिहास असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच, बाळासाहेबांचे एक खूप जुने स्वप्न आज साकार करत असल्याचेही त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहबे ठाकरे यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त या युतीची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईत झालेल्या या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत व्यासपीठावर शिवसेना ठाकरे गटाचे सुभाष देसाई, संजय राऊत, अरविंद सावंत तर वंचित बहुजन आघाडीकडून रेखा ठाकूर, अबुल खान उपस्थित होते.
( हेही वाचा: ‘युती टिकवण्याचे गुण उद्धव ठाकरेंमध्ये नाहीत; शिवशक्ती-भीमशक्ती युती टिकवतील यात शंका’ )
देश प्रथम याचा विचार घेऊन पुढे जाऊ – उद्धव ठाकरे
बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिवस आहे. प्रकाश आंबेडकर आणि आम्ही पुढची वाटचाल पुढे घेऊन जाण्यासाठी एकत्र आलो आहोत. माझे आजोबा आणि प्रकाश आंबेडकर यांचे आजोबा हे स्नेही होते. दोन्ही पिढ्यांचे वारसदार आणि जीवाला जीव देणार सहकारी एकत्र येऊन देश प्रथम याचा विचार करुन पुढे जाणार आहोत, असे ठाकरे यावेळी म्हणाले.