नवनीत राणांच्या अडचणी वाढणार? अजामीनपात्र वाॅरंट जारी, पोलिसांना कारवाईचे आदेश

162

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी नवनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र वाॅरंट काढण्यात आले आहे. तसेच पोलिसांनाही कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. शिवडी न्यायालयाने याबाबतचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे आता नवनीत राणा यांच्यावर काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

खासदार नवनीत राणा यांनी बोगस जात प्रमाणपत्राप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात दाद मागितली आहे. मात्र, सत्र न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे आता शिवडी न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिल्यामुळे नवनीत राणांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने पोलिसांना अजामीनपात्र वाॅरंट काढत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 7 नोव्हेंबर रोजी याप्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे. तोपर्यंत नवनीत राणा यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. आता मुलुंड पोलीस नवनीत राणांविरोधात अजामीनपात्र वाॅरंटवर नेमकी काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

( हेही वाचा: राज्यातील पोलीस दलात बदल्यांचे वारे; २५ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या )

नेमके प्रकरण काय?

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने 8 जून 2021 रोजी रद्द केले आहे. शिवाय त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली होती.

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनिल भालेराव यांनी नवनीत राणा यांच्या निवडणुकीला आव्हान देणा-या याचिका 2017 मध्ये उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. नवनीत राणा यांनी निवडणूक अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात अनुसूचित जमातीबाबत दिलेले प्रमाणपत्र बोगस आहे. त्यांनी जात प्रमाणपत्र समितीसमोरदेखील त्यांच्या जातीचा खोटा दावा केला आहे, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाने निर्णय देत जात प्रमाणपत्र रद्द केले. त्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 22 जून 2021 रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणा यांना दिलासा देत जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.