काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करणारे एक वक्तव्य केले आहे. म्हणे, सावरकर बलात्काराला राजकीय हत्यार मानायचे. त्यामुळे माझ्यासारख्या महिला भगिनींना भीती उत्पन्न होते. बलात्काराला विरोधकांविरुद्ध राजकीय हत्यार मानणारे सावरकर सगळ्या हिंदूंचे कसे काय आदर्श होऊ शकतात??, असा वरवर लॉजिकल वाटणारा पण प्रत्यक्षात बदनामीकारक सवाल शिवानी वडेट्टीवार यांनी एका कार्यक्रमात केला आहे. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर आज 14 एप्रिल आंबेडकर जयंतीला मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. शिवानी वडेट्टीवार युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आहेत. त्यांच्या या भाषणामुळे त्या एकदम प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत.
पण हा मुद्दा एवढ्या पुरता मर्यादित नाही, तर तो राजकीय गदारोळा पलीकडे ‘काँग्रेसी’ कुटील राजकारणाचा अत्यंत बेरकी असा नमुना आहे!! इथे मुद्दाम “काँग्रेसी” हा शब्द वापरला आहे. फक्त “काँग्रेसच्या” हा शब्द वापरलेला नाही. तो कसा??, हे समजून घेण्याची गरज आहे.
राहुल गांधींनी आत्तापर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कथित माफीनाम्यावरून अनेकदा बदनामीकारक वक्तव्ये केली. त्यांना त्यासाठी वेगवेगळ्या खटल्यानांही सामोरे जावे लागत आहे. पण त्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आणि उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत थेट राहुल गांधींना सावरकरांची बदनामी सहन करणार नाही, असा दम भरला. त्यानंतर शरद पवारांनी देखील उघडपणे मध्यस्थी करून मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी झालेल्या 18 पक्षांच्या बैठकीमध्ये सावरकरांच्या सामाजिक कार्याविषयी माहिती देऊन त्यांच्याविषयी वक्तव्य करणे थांबवा, अशी सूचना केली आणि राहुल गांधी ठाकरे पवारांमुळे बॅकफूटवर गेल्याच्या बातम्या आल्या. अर्थातच या बातम्यांमुळे सावरकर महाराष्ट्रात नव्हे, तर देशात सेंटर स्टेजवर आले. एक प्रकारे काँग्रेससाठी आणि काँग्रेस ही राजकारणासाठी तो मोठा धक्का होता. या धक्क्यातून सावरण्यासाठीच पवारांनी मध्यस्थी करून राहुल गांधींना सावरकर मुद्द्यावर बॅकफूटवर जायला सांगितले होते.
पवारांचे नॅरेटिव्ह उद्ध्वस्त होत होते!!
पण हा मुद्दा तेवढ्यापुरताही मर्यादित नव्हता, तर त्या पलीकडे जाऊन तो शरद पवारांच्या “पॉलिटिकल नॅरिटीव्ह”च्या दृष्टीने फार गंभीर ठरला होता. तो म्हणजे पवारांनी गेल्या 15 – 20 वर्षांत हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे, असा नॅरेटिव्ह तयार केला त्यातून त्यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाची आणि व्यापक अर्थाने “काँग्रेसी” वीण घट्ट केली. सावरकरांचा मुद्दा राहुल गांधींनी सेंटर स्टेजवर आणल्यामुळे महाराष्ट्रात पवारांच्या “पॉलिटिकल नॅरेटिव्ह”ला धक्का बसला आणि तो धक्का राष्ट्रवादीला राजकीय नुकसानकारक ठरेल याची पक्की जाणीव पवारांना झाल्यानंतर त्यांनी मध्यस्थी करून सावरकर मुद्द्यावर राहुल गांधींना बॅकफूटवर ढकलले होते.
(हेही वाचा राहुल गांधींच्या विरोधात वीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांच्याकडून मानहानीचा दावा दाखल)
काँग्रेसी बेरकी राजकारण
त्यानंतर राहुल गांधी बॅकफूट वर गेल्याच्या बातम्या मराठी माध्यमांमध्ये आणि काही प्रमाणात हिंदी – इंग्रजी माध्यमांमध्ये जरूर आल्या, पण राहुल गांधी यांची देशात “पप्पू” इमेज असली, तरी ते ज्या पक्षाचे नेते आहेत त्या पक्षाचे नाव काँग्रेस आहे आणि काँग्रेस महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणामध्ये किती पक्की मुरलेली संघटना आहे, याची असंख्य उदाहरणे देशात उपलब्ध आहेत!!
ओबीसी महिला नेत्याला पुढे केले
विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी सावरकरांविषयी बदनामीकारक वक्तव्य करणे हा याच पक्क्या मुरलेल्या राजकारणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. ठाकरे – पवार एकत्र येऊन सावरकर मुद्द्यावर राहुल गांधींसारख्या काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्याला बॅकफूटवर ढकलू शकतात ना… मग सावरकर हाच मुद्दा वेगळ्या संदर्भात उपस्थित करून त्यांच्यापेक्षा तरुण आणि त्यातही ओबीसी महिला नेत्याला पुढे करून सावरकर मुद्दा राहुल गांधींना हवा तसा वळविण्याचा बेरकीपणा काँग्रेसने यातून केला आहे!!
शिवानी वडेट्टीवार काँग्रेसच्या पदाधिकारी आहेत. त्या ओबीसी समाजातून पुढे येतात. त्यांचे वडील विजय वडेट्टीवार ओबीसी आरक्षणासाठी संघर्षरत असलेले नेते आहेत. त्यामुळे शिवानी वडेट्टीवारांनी सावरकर मुद्दा पुन्हा पेटवणे हीच “काँग्रेसी” कुटील राजकारणाची बेरकी चाल आहे!!
राहुल गांधींनी सावरकरांची बदनामी केली म्हणून उद्धव ठाकरेंची राजकीय पंचाईत झाली. पवारांनाही सावरकर मुद्दा महाराष्ट्रात आणि राष्ट्रीय पातळीवर परवडणारा नव्हता. मग आता शिवानी वडेट्टीवार यांच्यासारख्या ओबीसी तरुण महिला नेत्याकडून सावरकर मुद्दा पुढे आल्यानंतर ठाकरे – पवार काय प्रतिक्रिया देतील?? ती प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते तितक्या सहजतेने स्वीकारतील का??, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
त्याचबरोबर सावरकर मुद्दा जातीय पातळीवर तापविणे याचा लाभ कोणाला होईल??, जातीय मुद्दे उपस्थित करून महाराष्ट्रात सर्वात जास्त राजकीय लाभ कोणी घेतला??, हे तपासण्यासाठी फार दूर जाण्याची गरज नाही!!
सावरकर गौरव यात्रेला काटशह
शिवाय महाराष्ट्रात सत्ताधारी शिवसेना – भाजप यांनी काढलेल्या सावरकर गौरव यात्रेला जो प्रचंड प्रतिसाद मिळाला, त्यामुळे सावरकर या मुद्द्याला नकारात्मकतेकडून सकारात्मकेकडे मोठा प्रतिसाद मिळाल्याचे सिद्ध झाले. त्याला राजकीय आणि सामाजिक काटशह देण्यासाठी काँग्रेसने महाराष्ट्र पातळीवरची ओबीसी महिला नेता निवडली आहे, हाच “काँग्रेसी” कुटील राजकारणाचा बेरकी नमुना आहे!! आणि तो नेमकेपणाने समजून घेण्याची गरज आहे.
लेखक – विनायक ढेरे
Join Our WhatsApp Community