महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची रविवारी जयंती राज्यामध्ये सर्वत्र उत्साहामध्ये साजरी केली जात आहे. किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीचा मुख्य कार्यक्रम होत आहे. या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. या ठिकाणी शिवभक्तांची अडवणूक झाल्याने संभाजीराजे छत्रपती चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी संतप्त भावना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केल्या.
काय म्हणाले संभाजीराजे?
VIP लोकांसाठी शिवभक्तांची अडवणूक का करता? अशी थेट विचारणा त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. संभाजीराजे यांनी व्यक्त केलेल्या नाराजीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भावना समजून घेतल्या.
( हेही वाचा: अमित शाहांच्या ताफ्यात गाडी घातल्याने पुण्यात एकाला अटक )
पुढल्या वर्षीचे नियोजन चोख असेल
संभाजीराजेंच्या संतप्त भूमिकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही तुमच्या भावनांशी एकरुप आहोत. आम्ही तुमच्या भावनांची दखल घेतली आहे. राज्यातील गडकोट संवर्धन करण्याचे काम सरकारकडून नक्की केले जाईल आणि हे सर्व काम करत असताना आपल्याला विश्वासात घेतले जाईल. तसेच, पुढच्या वर्षी होणा-या शिवजयंतीचे नियोजन चोख केले जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
Join Our WhatsApp Community