सांगलीत राडा! मुख्यमंत्र्यांसमोर नेमके काय घडले? 

भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी सरकारी मदतीबाबत मुख्यमंत्र्यांसमोर नाराजी व्यक्त केली.

91

मागील आठवड्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पूरग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. त्याप्रमाणे सोमवारी, २ ऑगस्ट रोजी ते सांगली येथे आले, मात्र त्यावेळी अचानक शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले. त्या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने मुख्यमंत्री ठाकरे अखेर तेथील दौरा आटपून माघारी परतले.

मुख्यमंत्र्यांसमोर तणावग्रस्त परिस्थिती! 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सांगलीत हरभट बाजारपेठेत आले आणि त्याठिकाणी पुराच्या पाण्याने जे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले, ते समजून घेत होते, त्याच वेळी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. सरकारी मदतीवर नाराजी व्यक्त करत ती नाराजी मुख्यमंत्र्यांसमोर मांडायला सुरु केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. काही वेळाने भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. ठिय्या आंदोलन सुरु केले. परिणामी तिथे उपस्थित शिवसैनिकदेखील आक्रमक झाले. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापटी झाल्या. अखेरीस पोलिसांनी धाव घेऊन दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न केला.

निवेदने न स्वीकारताच मुख्यमंत्री परतले! 

भाजपच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांपासून दूर हुसकावून लावण्यासाठी शिवसैनिक पुढे सरसावले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. गर्दीतील लोक सैरावैरा धावू लागले. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांचा ताफा या परिसरातून निघून गेला. मुख्यमंत्री गेल्यानंतरही काही वेळ हा गोंधळ सुरूच होता. भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर बसून निदर्शने करत होते. दरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री आमची निवेदने न घेताच गेले असा आरोप केला. तर शिवसेनेने हा आरोप फेटाळून लावत, मुख्यमंत्र्यांनी सांगलीतील अन्य पूरग्रस्त भागातील नागरिकांची निवेदने स्वीकारली आहेत, असे म्हणत शिवसैनिकांनी सेनेची भूमिका स्पष्ट केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.