दसरा मेळाव्यात कदमांच्या विरोधात घोषणाबाजी…आधीही आणखी एका सेना नेत्याला झालेला विरोध!

यंदाच्या दसरा मेळाव्यात रामदास कदम आले नाही, तरी त्यांच्या विरोधात शिवसैनिकांनी 'रामदास कदम मुर्दाबाद ,रामदास कदम गद्दार आहे', अशा घोषणा दिल्याच. 

175

शिवसेनेचा दसरा मेळावा…व्यासपीठावरील मान्यवर, त्यांची आसनव्यवस्था, कुणाची खुर्ची कुणाच्या बाजूला, कुणाकुणाला बोलण्याची संधी मिळणार या सर्व बारीक सारीक गोष्टींमागे कोणता ना कोणता अर्थ असतो. त्यामुळे दसरा मेळाव्यात नुसत्या भाषणातील मुद्यावरून सेनेच्या पुढील राजकारणाचे दिशादर्शन होत नाही, तर याही गोष्टींमुळे अनेक गोष्टींचा अर्थ उलगडत असतो. असाच २०१३ सालीचा दसरा मेळावा या गोष्टींमुळे चर्चेत आला होता. ज्यामध्ये पहिल्यांदा शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याला शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठावरून खाली उतरून घरी परतावे लागले होते. त्यानंतर शुक्रवारी, १५ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या दसरा मेळाव्यात याची पुनरावृत्ती होणार होती, मात्र सेनेच्या नेत्यांनी ती टाळली, तरीही सेना नेते रामदास कदम यांच्या विरोधात शिवसैनिकांनी घोषणाबाजी केलीच.

…आणि सरांना शिवसैनिकांनी खाली उतरवले! 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असेपर्यंत शिवसेनेत मनोहर जोशी यांची चलती होती. पक्षात त्यांना जवळपास दुसऱ्या क्रमांकाचे स्थान आणि तितकेच महत्त्व होते. त्यामुळेच खासदारकीची निवडणूक हरल्यानंतरही त्यांना राज्यसभेत पाठविण्यात आले होते. मात्र, महापालिका निवडणुकीत दादरमधील सर्व जागा गमवाव्या लागल्याने उद्धव ठाकरे त्यांच्यावर नाराज होते. त्यामुळेच राज्यसभेची मुदत संपल्यानंतर उद्धव यांनी त्यांना २०१४च्या लोकसभेत सक्तीची विश्रांती दिली. तेव्हापासून मनोहर जोशी काहीसे अस्वस्थ होते. २०१४च्या निवडणुकीची चाहूल लागल्यानंतर जोशी यांनी पुन्हा उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, जोशींना पुन्हा उमेदवारी देण्याचा शिवसेनेचा विचार नव्हता. आपल्याला उमेदवारी मिळणे अवघड असल्याचे लक्षात येताच जोशींनी उलटसुलट वक्तव्य करणे सुरू केले. वय, अनुभव आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याशी अखेरपर्यंत राहिलेल्या स्नेहाच्या जोरावर आपण उद्धव यांना राजी करून घेऊ असा जोशी सरांचा होरा होता. पण या लढाईत शिवसैनिक उतरले आणि बाजी पलटली. २०११३च्या दसरा मेळाव्यात याचा प्रत्यय आला. मनोहर जोशी व्यासपीठावर बसताच खालून शिवसैनिकांनी जोशी यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली. त्यांना खाली उतरण्यास सांगितले. नाईलाजाने मनोहर जोशी व्यासपीठावरून खाली उतरले आणि तडक दादर येथील त्यांच्या घरी गेले.

(हेही वाचा : उद्धव ठाकरेंची होतेय राहुल गांधींसोबत तुलना! सेनेकडून राजकीय विचारधारेचे सीमोल्लंघन?)

रामदास कदम ठरले गद्दार! 

२०१३च्या दसरा मेळाव्याची पुनरावृत्ती २०२१च्याही मेळाव्यात झाली. नारायण राणे सेनेतून बाहेर पडल्यावर कोकणात जाऊन त्यांच्याविरोधात बोलण्याची धमक दाखवली म्हणून रामदास कदम बाळासाहेबांच्या विश्वासातील बनले. पुढे त्यांना आमदार केले, मंत्री केले, विरोधी पक्षनेते बनवले. मात्र २०१९च्या विधानसभा निवडणुकीत रामदास कदमांना उमेदवारी दिली नाही म्हणून रामदास कदम नाराज होते, पक्षात जुन्या नेत्यांना स्थान उरले नाही, नव्यांची चलती सुरु झाली आहे, याची सल कदम यांच्या मनात आहे. त्यातच त्यांनी सध्या उद्धव ठाकरे यांच्या जवळ गेलेले मंत्री अनिल परब यांचा विरोधात भाजप नेते किरीट सॊमय्या यांना कागदपत्रे पुरवल्याचे उघडकीस आल्याने कदम वादात सापडले. कदम यांनी याचा खुलासा करणारे ६ पानी पत्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवले. त्यात त्यांनी हा आरोप नाकारला. असे असले तरी कदम यांनी दसरा मेळाव्यात हजर राहण्याची हिंमत केली नाही. तब्येतीचे कारण सांगत कदम यांनी दसरा मेळाव्याला येणे टाळले. कदम यांच्यावर झालेले आरोप आणि दसऱ्या मेळाव्याच्या वेळीच कदम यांची तब्येत बिघडणे म्हणून त्यांनी मेळाव्याला गैर हजेरी दाखवणे, हा योगायोग नक्कीच नव्हता. कारण सेनेच्याच नेत्यांनी कदम यांना मेळाव्याला न येण्यास सांगितल्याचे सूत्रांची माहिती आहे. शिवसैनिक रागाच्या भरात विरोध करतील आणि रंगाचा बेरंग होईल, अशी शक्यता नेत्यांनी व्यक्त केली. म्हणून कदम मेळाव्याला आले नाही. २०१३ सालीच्या दसरा मेळाव्यात मनोहर जोशी मान खाली घालून व्यासपीठावरून खाली उतरले होते, तेव्हा रामदास कदम व्यासपीठावरच होते आणि ते त्यांनी पाहिले होते. यंदाच्या मेळाव्याला रामदास कदम आले नाही तरी त्यांच्या विरोधात शिवसैनिकांनी ‘रामदास कदम मुर्दाबाद ,रामदास कदम गद्दार आहे’, अशा घोषणा दिल्याच.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.