शिवसेनेतील ४० आमदार एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. आता अशीच फूट शिवसेनेत संसदेतही पडणार, अशी चिन्हे दिसत आहेत. कारण राष्ट्रपती निवडणुकीसाठी शिवसेनेचे ११ खासदार हे भाजपाचे नेते गृहमंत्री अमित शहा यांना भेटले आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेत दिल्लीच्या पातळीवर फूट पडली तर शिवसेनेत ही उभी फूट पडल्याचे सिद्ध होईल.
मुर्मूंच्या बाजूने मतदान करण्यासाठी व्यूहरचना
सोमवारी, ११ जुलै रोजी दुपारी ‘मातोश्री’मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीनंतर शिवसेना नेते संजय राऊत बाहेर आले आणि माध्यमांशी काहीही न बोलता तडक निघून गेले. या बैठकीत खासदार आणि संजय राऊत यांच्याल खडाजंगी झाल्याचे समजते. ही माहिती येत असतानाच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. शिवसेनेच्या खासदारांनी या आधीच अमित शहा यांची भेट घेतली. गृहमंत्री अमित शहा हे कृष्णा मेनन या निवासस्थानात राहतात. या निवासस्थानाला एकूण तीन प्रवेशद्वार आहेत. यापैकी मुख्य प्रवेशद्वार हे मेनन रोडवर आहे, तर या निवासस्थानाला एक मागील प्रवेशद्वार देखील आहे. तसेच एक मधले प्रवेशद्वार देखील आहे. याच मागच्या प्रवेशद्वारातून शिवसेनेचे एकूण 11 खासदार गृहमंत्री अमित शहा यांना भेटले, अशी माहिती सांगितली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या खासदारांबरोबर गृहमंत्र्यांनी सविस्तर चर्चा केल्याची सूत्रांची माहिती आहे. 18 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मुर्मू यांच्या बाजूने मतदान करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यूहरचना केल्याची सूत्रांची माहिती आहे.
(हेही वाचा ‘शिवसेनेने राष्ट्रपती पदासाठी राजकारणापलिकडे जाऊन पाठिंबा दिला’, राऊतांचे सूचक विधान)
Join Our WhatsApp Community