पुण्यात किरीट सोमय्यांना धक्काबुक्की! शिवसैनिकांनी अडवली गाडी, नेमकं काय घडलं

118

भाजाप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात पुण्यात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. पुणे महापालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढावा, अशी मागणी करत शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान जोरदार घोषणाबाजी केली आहे. यावेळी काही शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रयत्न केला, तर त्यांना धक्काबुक्की केली. या झटापटीत किरीट सोमय्या जखमी झाले असून एक्सरे काढण्यासाठी आणि इतर तपासण्या करण्यासाठी ते पुण्यातील संचेती रुग्णालयात दाखल झाले आहेत.

किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी सोमय्या पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जात असताना काही शिवसैनिकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सोमय्या यांना त्या ठिकाणावरून काढता पाय घ्यावा लागला. किरीट सोमय्या हे पुणे महापालिकेत जम्बो कोविड सेंटरबाबत तक्रार करण्यासाठी आज पुण्यात आले आहेत. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. परंतु, यावेळी कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली आणि पोलीस ठाण्यात निघालेल्या सोमय्या यांची गाडी शिवसैनिकांनी अडवली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. याबाबत त्यांनी ट्वीटही केले. ते म्हणाले, पुणे महापालिकेच्या आवारात शिवसेनेच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केला.

(हेही वाचा -“राऊतांचा मित्रांना हाताशी धरुन १०० कोटींचा घोटाळा”, काय म्हणाले सोमय्या? )

नेमके काय घडले…

किरीट सोमय्या हे पुणे महापालिका परिसरात असतानाच काही शिवसैनिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसंच सोमय्या यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्नही काही शिवसैनिकांनी केला. इतकंच नाही तर सोमय्या यांच्या गाडीपुढे काही शिवसैनिक आडवे पडले. तर काहींनी त्यांच्या गाडीची काच फोडण्याचा प्रयत्न केला. एक महिला तर सोमय्या यांच्या गाडीवर चप्पूल फेकून मारताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यामुळे सोमय्या यांच्यावरील हा हल्ला ठरवून केला गेला का? असा सवाल आता भाजप नेते उपस्थित करत आहेत.

काय केले आहेत आरोप

पुण्यातील जम्बो कोविड सेंटर चालवण्याचे कंत्राट लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीला देण्यात आले होते. कोविड सेंटर सुरू असताना त्यात अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. त्यासाठी रुग्णालयाचे व्यवस्थापन कारणीभूत असून लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्व्हिसेसला या कामाचा अनुभव नसताना सेंटरचे कंत्राट देण्यात आले. कोविड सेंटरच्या कामासाठी आवश्यक असलेल्या पात्रतेकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्यामुळे रूग्णांचे मृत्यू झाले. लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्व्हिसेस सुजित पाटकर यांची कंपनी आहे. पाटकर हे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलींच्या कंपनीत भागीदार आहेत. काळ्या यादीत टाकलेल्या या कंपनीला जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट देण्यात आले. या प्रकरणी सरकार तसेच संबंधित यंत्रणांकडून कामात कसूर झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, यासाठी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सोमय्या यांनी तक्रार दाखल केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.