उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथील शेतकरी हल्ल्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंद कशाकरता?, असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या बंदला विरोध केला. त्यानंतर कालपर्यंत मुंबई, पुण्यासह बहुतेक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी या बंदला विरोध केला. बेस्टमधील वर्कर्स युनियन असो कि ऑटो-रिक्षा युनियन असो या सगळ्यांनी विरोध केला. त्यामुळे बंदच्या दिवशी सकाळच्या सत्रात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे लक्षात येताच शिवसेनेने रस्त्यावर उतरून बंद यशस्वी करण्यास सुरुवात केली.
बेस्टच्या ८ बसगाड्यांची तोडफोड
या बंदच्या पार्श्वभूमीवर बेस्टच्या बसगाड्यांवर परिणाम झाल्याच्या घटना घडल्या. मध्यरात्रीपासून बंदला सुरुवात झाली. सोमवारी पहाटेच्या वेळी बेस्टच्या ८ बसगाड्यांवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर, चारकोप, ओशिवरा, देवनार, इनॉर्बिट मॉल अशा विविध भागात या तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने पोलिस संरक्षणात सेवा ठेवण्याचा निणय घेतला, मात्र बेस्टमधील शिवसेनाप्रणित कामगार सेनेने आगारातून बसगाड्या बाहेर काढण्यास विरोध केला.
जो काही बंद आहे तो भीतीने आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेला आवाहन केले की शिवसेना स्टाईलने बंद करा. म्हणजे यांच्यात काहीच ताकद नाही, वारंवार मी हा मुद्दा उद्धवजींकडे मांडतोय की हे तुमच्या जीवावर हे मोठे होत आहेत. बंद करायला यांच्याकडे लोक नाहीत, यांचा धाक नाही. शिवसेनेने बंद केला म्हटल्यावर लोक लगेच घाबरतात. कोल्हापुरचे एक महान नेते म्हणाले, शिवसेना स्टाईल बंद करा, मग हा जो बंद झालाय तो थोडाफार तरी मनापासून झालाय का, व्यापाऱ्यांची मुलाखत घ्या आणि त्यांना विचारा लखीमपूरमध्ये काय घटना घडली ते म्हणतील माहित नाही. पुण्यामध्येही तिन्ही पक्षाचे नेते व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांना जाऊन विनंती करतात की तुम्ही बंद करा.
– चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
(हेही वाचा : महाराष्ट्र बंद : दादर मार्केट सुरु, बेस्ट सेवा बंद!)
ठाण्यात मारहाण
बंद यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते ठाण्यातल्या रस्त्यावर उतरले. यावेळी त्यांनी रिक्षावाल्यांना रिक्षा बंद करण्यासाठी सांगत मारहाण केली आहे. ही मारहाण कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना ठाणे रेल्वे रिक्षा स्टॅड जवळची आहे.
कोल्हापुरात महामार्ग अडवला
बंगळुरू महामार्गावर शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन करून महामार्ग बंद केला. त्यामुळे तब्बल २-अडीच तास महामार्ग बंद होता. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
सोलापुरात टायर जाळले
सोलापुरात युवा सेनेने संगम येथे टायर जाळून बंदची सुरुवात केली. युवासेना माळशिरस तालुक्याच्या वतीने संगम येथे युवा सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात सहभागी होऊन रस्त्यावर टायर जाळून बंदची सुरुवात झाली. यावेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्री याचा निषेध करत राजीनामा द्यावा आणि भारतीय शेतकरी जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. हा निषेध सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातल्या संगम या ठिकाणी करण्यात आला.
(हेही वाचा : ‘महाराष्ट्र बंद’च्या दिवशी भाजपाने शिवसेनेला करून दिली ‘ही’ आठवण!)
Join Our WhatsApp Community