दिल्लीत बस्तान बसवण्यासाठी ‘धनुष्या’ला हवाय ‘हात’!

आणीबाणीच्या वेळी शिवसेनेने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पाठिंबा देत काँग्रेसच्या 'गुडबुक'मध्ये समावेश केला. तेव्हापासून सेनेची महाराष्ट्रात काँग्रेसच्या मदतीने खऱ्या अर्थाने घोडदौड सुरू झाली.

96

शिवसेनेला आता दिल्लीच्या राजकारणात ठसठशीत ठसा उमटवण्याची तीव्र इच्छा झाली असून त्यासाठी शिवसेना पुन्हा एकदा काँग्रेसची मदत घेणार आहे. याआधीही शिवसेनेने महाराष्ट्रात पाय मजबूत करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या सहकार्याने दिल्लीत आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांचे मन जिंकले होते, आताही दिल्लीत पाय मजबूत करण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जवळ जात आहेत. त्याकरता त्यांनी चालू संसदीय अधिवेशनाचा पुरेपूर लाभ उठवला आहे. सध्या राऊत दिल्लीत कोणत्या ना कोणत्या निमित्ताने राहुल गांधींना भेटत आहेत, माध्यमांसमोर येताना ‘राहुल गांधी यांच्या बाजूला राहून फोटोत येऊ’, अशी व्यवस्था करत आहेत. राहुल गांधी देखील त्यांना प्रतिसाद देत आहेत. राऊत यांच्या प्रयत्नांना आता फळ येवू लागले असून येत्या २० ऑगस्ट रोजी सोनिया गांधी आणि त्यांची भेट होणार आहे, त्यावेळी राऊत एकटेच नाही तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेटणार आहे, अशी चर्चा आहे. त्याला निमित्त म्हणजे सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्षांची होणारी बैठक हे आहे.

राहुल तो बहाणा है सोनिया गांधी तक पहुंचना है!

सोमवारी, २ ऑगस्ट रोजी राऊत यांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन सेनेच्या ‘वाढी’चा इतिहास सांगून त्यांच्यात उत्सुकता निर्माण केली होती. चर्चेच्या ओघात सेना आणि काँग्रेसचे याआधीचे नातेसंबंध देखील विशद केले. त्यामुळे साहजिकच राहुल गांधी यांना शिवसेना ‘जाणून’ घेण्याची उत्सुकता लागली. लागलीच दुसऱ्या दिवशी मंगळवारी, ३ ऑगस्ट रोजी राऊत पुन्हा सकाळी विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत राहुल गांधी यांच्यासोबत चहापान केला. शिवसेना अजूनही यूपीएचा घटक बनलेली नाही, तरीही सध्या शिवसेनेचे प्रतिनिधित्व संजय राऊत यूपीए नेत्यांच्या बैठकीत बसून करतांना दिसत आहेत. बुधवारी, ११ ऑगस्ट रोजी विरोधी पक्षांनी राज्यसभेत गोंधळ घातला, त्यामुळे मार्शलला बोलावून विरोधकांच्या सदस्यांना सदना बाहेर काढण्यात आले, त्याचा निषेध विरोधकांनी गुरुवारी, १२ ऑगस्ट रोजी संसदेच्या बाहेर मोर्चा काढून केला. त्यावेळीही संजय राऊत हे राहुल गांधीच्या शेजारी दिसले, राहुल गांधी यांनी भाषण केल्यावर त्यांनी लगेचच माईक राऊत यांचा हाती दिला. यावरून सेनेला दिल्लीत बस्तान बसवताना काँग्रेसची साथ किती फायदेशीर ठरत आहे, हे दिसून आले! संजय राऊत हे राहुल गांधी यांचा विश्वास संपादित करण्याची कामगिरी चोख बजावत असले तरी काँग्रेस म्हणजे सोनिया गांधी हे समीकरण अजूनही कायम आहे, महाराष्ट्रात सरकार बनवण्यासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधींशी थेट चर्चा शरद पवारांनी केली आहे, त्यात सेनेचा कुठेच थेट संबंध नव्हता, मात्र इथे दिल्लीत सेनेला स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचे आहे, त्यासाठी काँग्रेसची मदत घ्यायची आहे. त्याकरता सोनिया गांधी यांच्या ‘गुडबुक’मध्ये सेनेला यायचे आहे, त्याची पहिली पायरी राहुल गांधी असून ती सेनेने चढली आहे, म्हणूनच २० ऑगस्ट रोजी सोनिया गांधी यांच्या सोबत सर्व विरोधक यांच्या सोबत होणाऱ्या बैठकीत सेनेला विशेष आमंत्रण मिळाले आहे.

(हेही वाचा : आझाद मैदान दंगल : धर्मांध मुसलमान आरोपी मोकाट, पीडित न्यायाच्या प्रतीक्षेत!)

काय म्हणतो इतिहास? 

६०-७० च्या दशकांत मुंबईत जोवर कम्युनिस्ट पक्षाचे प्राबल्य होते, तोवर सेनेला वाढणे शक्य नव्हते. त्यावेळी काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या मदतीने सेनेचे मुंबईत राजकीय प्रस्थ कसे वाढले, हे सर्वश्रुत आहे. त्यांनतर आणीबाणीच्या वेळीही शिवसेनेने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पाठिंबा देत काँग्रेसच्या ‘गुडबुक’मध्ये सेनेचा समावेश केला. तेव्हापासून सेनेची महाराष्ट्रात काँग्रेसच्या मदतीने खऱ्या अर्थाने घोडदौड सुरू झाली.

वर्तमानातही जुनी पायवाट धरली! 

मागील २ वर्षे राज्यात शिवसेनेचे दोन्ही काँग्रेससोबत सरकार आहे. या दोन वर्षांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी शिवसेना नेते संजय राऊत यांनी शुभेच्छा देताना ‘उद्धव ठाकरे हे देशाचे नेतृत्व करण्यास सक्षम आहेत’, असे म्हणाले आहेत. त्यावरून येनकेन प्रकारेण शिवसेनेला दिल्लीत स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचे आहे. त्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत सक्रिय झालेले दिसत आहेत. त्याकरता ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी आता सलगी निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. राऊत यांच्या आता राहुल गांधी यांच्यासोबतच्या भेटी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. संसेदच्या अधिवेशनानिमित्ताने राऊत दिल्लीत आहेत. या दरम्यान राऊत हे किमान ८-९  वेळा राहुल गांधी यांना भेटले आहेत.

…तर सेना विश्वास गमावून बसेल!

सोमवारी, २ ऑगस्ट रोजीच्या भेटीचा तपशील ट्विटरवरून देताना राऊत म्हणाले होते कि, राहुल गांधी दोन वर्षांत महाराष्ट्रात आलेले नाहीत. ते लवकरच राज्यात येणार आहेत. त्यांनी मला राज्यातील राजकारणाबद्दल काही प्रश्न विचारले. त्याबद्दल मी त्यांना माहिती दिली. बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यशैलीबद्दल त्यांना कुतूहल आहे. त्यांनी इतकी मोठी संघटना कशी उभी केली, ती कशी चालवली याबद्दलची माहिती राहुल यांनी जाणून घेतली, असे राऊत म्हणाले होते. राऊत यांनी जाणीवपूर्वक ही माहिती देवून दिल्लीत सेनेने नवा भिडू मिळवला आहे, हा संदेश दिला. मात्र त्याचवेळी आम्ही देशहिताच्या विषयांवर विरोधकांसोबत ठामपणे उभे आहोत. मात्र आम्ही यूपीएचे भाग नाही. आम्ही आमची स्वतंत्र वाटचाल सुरू ठेवली आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. सेनेच्या या दोन्ही पायांवर दगड ठेवण्याच्या भूमिकेचे विश्लेषण केल्यास सेनेची २०२४ च्या लोकसभेची चाचपणी सुरू असल्याचे ध्वनित होते, मोदी सरकारच्या विरोधात यूपीए सोबत राहत दिल्लीत अस्तित्व निर्माण करायचे. कदाचित निवडणुकीपर्यंत वातावरण बदलले, तर यूपीए सोबत राहून देशाची निवडणूक लढवायची अन्यथा तसे काही घडले नाही, तर वेगळे अस्तित्व कायम ठेवल्याने एनडीए सोबतची जुनी पायवाट धरायची. अशा प्रकारे ना यूपीएत जायचे ना एनडीएत जायचे, अशी रणनीती सेनेची दिसत आहे, पण दोन्ही दगडांवर पाय ठेवण्याच्या रणनीतीने सेना विश्वास गमावून बसेल.

(हेही वाचा : गोवंश नामशेष करण्यासाठी बैलगाडा शर्यतीवर बंदी! आमदार पडळकरांचा गंभीर आरोप)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.