राज ठाकरे यांनी शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच जाहीर भाषण केलं. अनेक मुद्द्यांवर त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधन केलं. आता ही वेळ वेगळी आहे. पूर्वी एक काळ होता, जेव्हा केवळ भाषणे दिल्याने नेता मोठा होत होता. परंतु आताची परिस्थिती बदलली आहे. सोशल मीडिया मजबूत झालेला आहे. जनतेला सोबत घेऊन जाणारा आणि कार्यक्रम देणारा नेता आवडतो. जनतेला राज्याच्या व देशाच्या अनेक गोष्टीत सहभागी व्हायचे असते. पण जनता म्हणजे केवळ आपल्या पक्षाचे कार्यकर्ते नव्हे. जनता ही पक्षाच्या पलीकडे असते. जनतेला पचतील व जमतील असे कार्यक्रम राबवले पाहिजे. ह्याला गाड, त्याला गाड असल्या वृत्तीतून आता नेत्यांनी बाहेर पडले पाहिजे. शिस्तबद्ध कार्यक्रम राबवून पक्ष वाढवता येतो आणि सत्ताही मिळवता येते हे भाजपाकडे पाहून कळते.
गणेशोत्सवाचा फायदा करावा
उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडशी युती केल्यामुळे राज ठाकरे यांना भरपूर संधी आहे. आता गणेशोत्सव सुरु होणार आहे. या उत्सवात मनसे अनेक गोष्टी करु शकते. मनसे एक मोहिम राबवून सार्वजनिक गणेशोत्सवाला लोक चळवळीचे स्वरुप देऊ शकते. प्रत्येक गणेशोत्सव मंडळाला एक पत्रक द्यायचे, ज्यात हिंदू हिताच्या प्रतिज्ञा लिहिलेल्या असतील. ठराविक वेळी ही प्रतीज्ञा सर्व गणेशोत्सव मंडळाने कार्यकर्त्यांसोबत म्हणावी.
(हेही वाचा हिंदुत्ववादी ते हिंदुत्वद्वेष्टे; हा उलटा प्रवास कसा केलात उद्धव ठाकरे?)
हिंदवी हा शब्द जनमानसात रुळेल
तसेच गणेशोत्सवात लोकमान्य टिळकांचे चरित्र जनतेपर्यंत पोहोचवता येईल, जेणेकरुन गणेशोत्सवाचा खरा अर्थ कळेल. राज ठाकरे यांनी मनसेचे ओळखपत्र सोशल मीडियावर शेअर केले होते, ज्यात ’मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक’ अशा ओळी होत्या. आता हिंदवी रक्षक म्हणजे काय? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा रक्षक. म्हणजे जर शिवरायांच्या विचारांना डावलून एखादी गोष्ट होत असेल तर मी प्रतिकार करणार आणि त्या तत्वाचे रक्षण करणार. आता हिंदवी हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. मनसे राज्य आणि केंद्र सरकारकडे निवेदन करु शकते की शिवाजी महाराज या नावापुढे केवळ छत्रपती न लावता, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज असे पूर्ण नाव लिहिण्यात यावे. जेणेकरुन हिंदवी हा शब्द जनमानसात रुळेल अणि शिवरायांनी कोणत्या कारणासाठी स्वराज्य निर्माण केले हे लोकांना कळेल. यासाठी सह्यांची मोहिम राबवता येईल. अशी अनेक लहान-मोठी कामे आहेत, ज्यात जनतेला सहभागी करुन घेता येईल. अगदी बाबासाहेब पुरंदरे यांच्या ग्रंथाचे पारायण ठेवता येईल. सर्वात महत्वाचे म्हणजे हिंदवी या शब्दाचा अर्थ मनसैनिकांना समजावून सांगावा लागेल. मनसैनिक बुद्धिमान असावा यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील.
Join Our WhatsApp Community