जेव्हा नार्वेकर म्हणतात, ‘यांना आताच शिवबंधन बांधा!’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधान भवनातील बैठक संपवून गाडीतून जात असताना अचानक विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, गिरीष महाजन तिथे आले, त्यावेळी मिलिंद नार्वेकर आणि या तिन्ही नेत्यांमध्ये गंमतीदार संवाद झाला.

मंगळवारी, २२ जून रोजी विधानभवन येथे संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. त्यानंतर बैठक आटोपल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनाच्या बाहेर पडले, त्यांच्यासोबत स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत होते. त्यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप नेते प्रसाद लाड यांच्या सोबत चर्चा झाली. त्यावेळी नार्वेकर यांनी दरेकर आणि लाड यांच्या हाती शिवबंधन बांधण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा दरेकर यांनी ‘सेना तर आमचे मूळ आहे, आम्ही केव्हाही एकत्र येऊ शकतो’, अशा शब्दांत प्रतिसाद दिला. त्यामुळे सेना-भाजप यांचा दोस्ताना पुन्हा होणार आहे का?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

…आणि सेना-भाजपचे नेते एकमेकांशी थट्टामस्करी करू लागले!

शिवसेना-भाजप गेली अनेक वर्षे एकमेकांसोबत असलेले हे मित्रपक्ष…सध्या जरी हे दोन्ही पक्ष एकत्र नसले तरी हे दोन्ही पक्ष कधीही एकत्र येतील, अशी चर्चा रंगू लागली आहे. आधीच प्रताप सरनाईक यांनी भाजपसोबत जुळवून घ्या, अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप-सेना एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच मंगळवारी, २२ जून रोजी विधानभवन परिसरात एक किस्सा घडला. एकमेकांवर आरोप करणारे आज एकमेकांसोबत हसताना दिसले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील या ठिकाणी होते. एवढेच नाही तर उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी तर चक्क विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर आणि भाजप नेते प्रसाद लाड यांच्या मनगटावर शिवबंधन बांधण्याची इच्छा व्यक्त केली. अशाप्रकारे विधानभवनात शिवसेना-भाजपच्या नेत्यांमध्ये अत्यंत जिव्हाळ्याचे नातेसंबंध पाहायला मिळाले.

(हेही वाचा : शाळेत प्रवेश नाही म्हणून त्यांनी मंत्रालय उडवण्याची दिली धमकी! )

काय होता ‘तो’ प्रसंग? 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधान भवनातील बैठक संपवून गाडीतून जात असताना अचानक विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड आणि गिरीष महाजन तिथे आले, त्यावेळी मिलिंद नार्वेकर आणि या तिन्ही नेत्यांमध्ये गंमतीदार संवाद झाला. मिलिंद नार्वेकर यावेळी म्हणाले उद्धव साहेब, यांनी तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न केला आहे का? त्याचवेळी प्रविण दरेकर म्हणाले, आम्ही केव्हाही येऊ शकतो. दरेकरांचे हे वाक्य ऐकताच मिलिंद नार्वेकर म्हणाले, यांना आताच गाडीत टाका, शिबबंधन बांधूया! हे ऐकून दरेकर म्हणाले, आम्ही केव्हाही एकत्र येऊ शकतो, हे आमचे मूळ आहे. हे ऐकून सर्वांचा हशा पिकला.

पवारांच्या ‘गटा’कडे सेनेची पाठ?

मंगळवारी, २२ जून रोजीच शरद पवार यांनी दिल्लीत भाजपविरोधात देशपातळीवर विरोधी पक्षांची तिसरी आघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरु केला. त्या बैठकीला मात्र शिवसेनेने पाठ फिरवली. ‘आम्ही कुणाची पालखी वाहणार नाही’, या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या वर्धापन दिनी केलेल्या वक्तव्याचे हे पडसाद होते का, अशीही चर्चा सुरु झाली आहे.

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची भेट

राज्यातील मराठा आरक्षणासह इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांची अर्धा तास खाजगीत भेट झाली. या भेटीच्या वेळी अजित पवार आणि चव्हाणांना बाजूला ठेवण्यात आले. त्यामुळे या भेटीवरुन सुद्धा शिवसेना आणि भाजप युतीतील गोडवा कायम असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

प्रताप सरनाईकांचे पत्र

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष शिवसेनेला कमकुवत करत असल्याचा प्रयत्न करत आहेत, असा गौप्यस्फोट केला. त्यामुळे शिवसेनेने पुन्हा एकदा आपले भाजप सोबतचे नाते जोडावे, असे त्यांनी सांगितले. या पत्रामुळे महाविकास आघाडीत शिवसेनेचे आमदार नाखूश असल्याचे स्पष्ट झाले.

बावनकुळे काय म्हणाले?

केवळ प्रताप सरनाईकच नाही तर शिवसेनेतील 90 टक्के नेते हे नाराज असल्याचे वक्तव्य भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. सरकारमध्ये फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाच महाविकास होत आहे. शिवसेनेच्या आमदारांची कुठलीही कामे होत नाहीत, त्यामुळे त्यांच्या मनातील ही नाराजी अशीच वाढली तर उद्या भाजप आणि शिवसेना एकत्र आले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नसेल, असे सूचक विधानही त्यांनी केले.

(हेही वाचा : पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवसांचे! विरोधकांनी केला हल्लाबोल)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here