ठाण्यात सेना-राष्ट्रवादीत रंगला ‘सामना’!

ठाण्यात महापालिका निवडणुकीत आव्हाडांची स्वतंत्र ताकद लागणार आणि एकनाथ शिंदे स्वबळाची नारा देणार, अशी चर्चा सुरु झाली आहे.

114

ठाणे महापालिका निवडणूक जवळ येताच त्याचे वेध आतापासून राजकीय पक्षांना लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी शिवसेना आणि राष्ट्रवादी हे महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष ठाण्यात मात्र समोरासमोर आले. त्यामुळे ठाण्यात महापालिका निवडणुकीत आव्हाडांची स्वतंत्र ताकद लागणार आणि एकनाथ शिंदे स्वबळाची नारा देणार, अशी चर्चा सुरु झाली आहे.

का झाला राडा?

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वैयक्तिक खात्यातून दिलेला २० लाख रुपयांचा धनादेश महापौर नरेश म्हस्के यांनी नाकारला. तसेच राष्ट्रवादीने कळवा भागात आयोजित केलेल्या लसीकरण मोहिमेचे बॅनर्स सेनेच्या कार्यकर्त्यांनी फाडले, या कारणामुळे राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक महापौरांवर संतापले. त्यांनी थेट महापौर दालनात धडक मारत गोंधळ घातला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

(हेही वाचा : राज्यातील उपहारगृहे व दुकानांच्या वेळा वाढणार! राज्य सरकारचा निर्णय)

दोन्ही बाजूने आरोप!

शिवसेना लसीकरणाबाबत नेहमीच राजकारण करुन लसीकरणाचे कार्यक्रम हाय जॅक करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला. तर येणारी निवडणूक बघता राष्ट्रवादी स्टंटबाजी करत असल्याचा महापौर नरेश म्हस्के यांनी आरोप केला आहे. दरम्यान  येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी होणार का, यावर शरद पवार यांनी आधीच भूमिका स्पष्ट केली आहे, याविषयावर त्या त्या भागातील महाविकास आघाडीतील नेते निर्णय घेतील, असे म्हटले होते. ठाण्याच्या निवडणुकीपूर्वी इथे सुरु झालेला महाविकास आघाडीतील राडा पाहिल्यावर इथे महाविकास आघाडीची बैठक होईल, अशी शक्यता कमी दिसत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.