शिवसेनेच्या स्थापनेला १९ जून २०२२ रोजी ५६ वर्षे पूर्ण होत आहेत. पाच दशकांमध्ये शिवसेनेचे नेतृत्व आज तिसरी पिढी करत आहे. परंतु या बदलातून कालपर्यंत प्रवाहात राहिलेले शिवसैनिक आज प्रवाहाच्या बाहेर आहेत. त्यामुळे शिवसेनेत कधी नव्हे इतकी नाराजी दिसून येत आहे, याचा शिवसेनेच्या ताकदीवर परिणाम होत आहे, हे निश्चित आहे. याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत आला.
मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन केलेल्या शिवसेनेला पुढे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रखर हिंदुत्वाची जोड दिली. बाळासाहेबांच्या मुशीतून अनेक शिवसैनिक तयार झाले, विविध विषयांवर लढले, झगडले, प्रसंगी रक्तही सांडले, या शिवसैनिकांच्या जोरावर शिवसेना वाढली, सत्तेपर्यंत पोहचली, त्यावेळी या शिवसैनिकांचा बाळासाहेबांनी यथोचित सन्मान केला, पदे देऊन त्यांना मोठे केले. मात्र बाळासाहेबांच्या नंतर शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले. शिवसेनेचा आक्रमक बाणा त्यावेळी गरजेचा होता, आता नाही असे सांगत उद्धव ठाकरे शिवसेना बदलत चालली आहे, असे सांगू लागले. त्यासोबत बाळासाहेबांच्या मुशीतून तयार झालेल्या रांगड्या शिवसैनिकांना हळूहळू प्रवाहातून बाहेर पडावे लागत आहे.
(हेही वाचा श्रीमद्भगवद्गीताला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून मान्यता द्या! हिंदु राष्ट्र संसदेत ठराव)
प्रवाहाच्या बाहेर पडलेले शिवसैनिक!
मनोहर जोशी – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेना वाढवणारे माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर दसरा मेळाव्यात व्यासपीठावरून अपमानित होऊन खाली उतरावे लागले होते, तेव्हापासून मनोहर जोशी राजकारणातून बाहेर पडले, अष्टप्रधान मंडळातील मनोहर जोशी यांना सध्या सल्लागार म्हणूनही दर्जा दिला नाही.
दिवाकर रावते – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेना वाढवण्यात सक्रिय राहिलेले दिवाकर रावते यांच्यात आजही तितकीच आक्रमकता आहे. १९९१ – ९२ मध्ये मुंबईतच महापौर बनलेले रावते १९९५च्या युती सरकारच्या काळात मंत्री होते, त्यानंतर २०१७पर्यंत आमदार राहिले. परंतु जसे शिवसेनेने भाजपशी युती तोडून काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी बनवून सरकार स्थापन केले आणि रावते त्यामधून हद्दपार झाले.
रामदास कदम – नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर त्यांनी कोकणातून शिवसेना हद्दपार करण्याचा विडा उचलला. त्यानंतर राणेंना सिंधुदुर्ग जिल्ह्यात रामदास कदम यांनी आव्हान दिले आणि रामदास कदम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळ आले. १९९०मध्ये रामदास कदमांना आमदारकी दिली, २०१५पर्यंत ते आमदार राहिले, युतीच्या सरकारच्या काळात मंत्री बनले, परंतु रामदास कदम हेही बाळासाहेबांच्या नंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेत अडगळीत पडले आहेत. त्यांना २०१९च्या विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी नाकारली.
(हेही वाचा गांधी घराण्याची झोप उडवणारे नॅशनल हेराल्ड प्रकरण आहे तरी काय?)
लीलाधर डाके – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेना वाढवणारे आणखी एक शिवसेना नेते लीलाधर डाके हे बाळासाहेब ठाकरे असेपर्यंत शिवसेनेत सक्रिय होते, मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर डाके शिवसेनेच्या प्रवाहातून बाहेर पडले, अष्टप्रधान मंडळातील एक डाके यांचा सल्ला घेणेही सध्या शिवसेना नेतृत्वाला नकोसे वाटत आहे.
विजय शिवतारे – जिथे राष्ट्रवादीची शक्ती जास्त आहे त्या पुणे जिल्ह्यात शिवसेनेला आव्हान देणारे विजय शिवतारे एकेकाळी शिवसेनेचे फायर ब्रँड नेते होते. २००९पासून २०१४ पर्यंत आमदार राहिलेले शिवतारे जेव्हा उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीची सलगी केली तेव्हापासून अचानक प्रवाहाच्या बाहेर फेकले गेले. त्या शिवतारेंना महाविकास आघाडीच्या काळात दूर रहावे लागले आहे
प्रवाहातील शिवसैनिक!
संजय राऊत – शिवसेनेचे मुखपत्र सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊत हे २००४ पासून राज्यसभेचे खासदार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असेपर्यंत राऊत कधीच दसरा मेळाव्यात व्यासपीठावर दिसले नाहीत. त्यांच्या निधनानंतर राऊत दसरा मेळाव्यात नुसतं हजरच नाही, तर पहिल्या फळीचे नेते म्हणून उद्धव ठाकरे यांच्या आधी भाषण करू लागले. भाजपशी २५ वर्षांची युती तोडून दोन्ही काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्यापर्यंत शिवसेनेच्या विचारधारेत बदल करण्यामध्ये राऊत यांनी प्रमुख भूमिका बजावली.
मिलिंद नार्वेकर – मिलिंद नार्वेकर हे १९९४ साली उद्धव ठाकरे यांचे सचिव बनले, अपॉइण्टमेण्ट घेणे, डायरी ठेवणे, फोन घेणे, दौरे आखणे, व्यवस्था करणे अशी कामे ते करू लागले. पुढे जसे उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची सत्ताकेंद्रे आली, तसे नार्वेकर मोठे झाले. शिवसेनाप्रमुख असेपर्यंत आमदार होण्याची नुसती इच्छा बाळगून राहणारे नार्वेकर बाळासाहेबांनंतर विधानपरिषदेत आमदार म्हणून गेले.
अनिल परब – शिवसेनेत जुने जाणते म्हणून अनिल परब यांची ओळख आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेत विधान परिषदेत आमदार म्हणून निवडून गेलेले अनिल परब तेव्हा तिसऱ्या रांगेत बसायचे संधी मिळेल तेव्हा बोलायचे, पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात अनिल परब यांचे विधिमंडळात वजन वाढू लागले. आज ठाकरे सरकारमध्ये परब पहिल्या फळीतील नेते बनले आहेत. मंत्री बनलेले परब अधिवेशनात गृहमंत्र्यांच्या प्रश्नावरही उत्तरे देऊ लागेल, सरकारची बाजू हिरहिरीने मांडू लागले. रामदास कदम यांनी याविषयी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
(हेही वाचा राज्यसभा निवडणूक : आमदारांची ‘ट्रायडेंट’, ‘ताज’ मध्ये ‘सोय’! भाडे ऐकूण व्हाल थक्क)
वरून सरदेसाई – महाविकास आघाडीचे सरकार आले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री झाले. त्यानंतर लागलीच विद्यार्थी सेनेची धुरा आदित्य ठाकरेंनी त्यांचे मावस भाऊ वरून सरदेसाईंना दिली आणि शिवसेनेत आदित्य पर्व सुरु झाल्याचे संकेत मिळाले. शिवसेनेत अचानक वरून सरदेसाई यांना मिळाले प्रमोशन जुन्याजाणत्या शिवसैनिकांच्या डोळ्यांत खुपली आहे.
प्रियंका चतुर्वेदी – प्रियांका चतुर्वेदी २०१० ते २०१९ पर्यंत कॉंग्रेस पक्षात होत्या आणि कॉंग्रेस युवा मोर्चा, पश्चिम मुंबईच्या अध्यक्षा देखील होत्या. पण नंतर २०१९ मध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंसमोर शिवसेनेत प्रवेश केला आणि लागलीच त्यांना उपनेते पद बहाल करण्यात आले, हे पद डॉ. नीलम गोऱ्हे यांना देण्यात आले आहे. चतुर्वेदी यांना राज्यसभेत खासदारकीही मिळाली, आज चतुर्वेदी दिल्लीत शिवसेनेचा चेहरा बनल्या आहेत.
Join Our WhatsApp Community