सध्या कोरोनाच्या काळात लोकांची रोजीरोटी गेली आहे, लोकांमध्ये अस्वस्थता आहे, असे असताना सत्तेसाठी स्वबळाचा नारा देत राहिलो, तर लोक जोडे मारतील. आधी आरोग्य आणि आर्थिक संकटापासून जनतेचे रक्षण करण्यासाठी पुढे आले पाहिजे. सत्ता आणि स्वबळ बाजूला ठेवून कोरोनावर लक्ष दिले पाहिजे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला फटकारले.
मागील काही दिवसांपासून काँग्रेस स्वबळाचा नारा देत काँग्रेस यापुढे स्वबळावर निवडणूक लढणार आहे, असे सांगत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनी शिवसैनिकांना संबोधित करताना काँग्रेसला लक्ष्य केले. शिवसेनेच्या ५५व्या वर्धापन दिनानिमित्ताने ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्याआधी शिवसेनेचे सरचिटणीस आदेश बांदेकर यांनी सूत्रसंचालन केले. त्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, मंत्री सुभाष देसाई यांनी भाषण केले.
(हेही वाचा : शिवसेना ५५ वर्षांची झाली हो !!!)
स्वबळाचा नारा देण्याआधी स्वबळ कमवा!
कोरोनाच्या काळात अनेक जण स्वबळाचा नारा देत आहेत, मग आपणही देऊ! सर्वांनाच स्वबळ पाहिजे असते. स्वबळ म्हणजे आत्मबळ. ज्या काळात मराठी माणसावर अन्याय होत होता, तेव्हा शिवसेना उभी राहिली आणि मराठी माणसाला न्याय हक्क मिळवून दिला. हे स्वबळ असते. न्याय्य हक्क मागण्यासाठी देखील स्वबळ लागते. नाहीतर अन्याय होतोय आणि अन्यायाविरुद्ध वार करायचाय पण बळच नाही आणि वार कसले करताय? त्यामुळे आधी स्वबळ तरी कमवा, तालवार हातात घेण्याची ताकद तरी कमवा, मग स्वबळाची भाषा करा. स्वबळ हा तर आमचा हक्क आहे. तो काही निवडणुकीसाठी करत नाही. न्यायहक्कासाठी आम्ही हा स्वबळाचा नारा देतो. स्वबळ हे स्वाभिमानाचे, अभिमानाचे असते, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. बंगालची निवडणूक झाली, तेव्हा ममता बॅनर्जी ज्या प्रकारे लढल्या ते स्वबळ. अनेक हल्ले झाले तरी बंगालने त्यांचा विचार सोडला नाही. बंगालने प्रादेशिक अस्मिता कशी जपायची हे दाखवून दिले आहे. पण आमच्यासाठी प्रादेशिक अस्मितेसोबत हिंदुत्व हेही महत्वाचे आहे. हिंदुत्व आमचा श्वास आहे. त्यामुळे आम्ही आघाडी केली, युती तुटली म्हणून हिंदुत्व सोडले, असा अर्थ होत नाही. कोरोनाच्या काळात ज्याप्रकारे राजकरण सुरु आहे, ही विकृती आहे. केवळ सत्तेसाठी सुरु आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेना उगाच कुणाची पालखी वाहणार नाही!
शिवसेनेने जेव्हा मराठी माणसाच्या हिताचा विचार मांडला, तेव्हा शिवसेनेला प्रांतवादी, संकुचित ठरली. त्यानंतर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा नारा दिला, गर्व से काहो हम हिंदू है, असे पहिल्यांदा म्हटले. सोबत राष्ट्रीयत्वचा विचार मांडला, तेव्हा मात्र शिवसेनेला धर्मांध म्हणून हिणवले जाऊ लागले. टीका करणारे करणारच. जेव्हा जेव्हा शिवसेनेवर प्रादेशिकवादाचे, धर्मांधतेचे आरोप होतात, तेव्हा ते विसरतात कि, देशावर जेव्हा संकट येते, तेव्हा हीच शिवसेना पुढे येते, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. घराच्या बाहेर पडत नाही म्हणून माझ्यावर टीका होते. घरात राहून इतकी कामे झाली, बाहेर पडलो तर किती कामे होतील, मी बाहेर पडणारच आहे. पण सध्याची परिस्थिती तशी नाही. हेही समजून घेतले पाहिजे. शिवसेना सत्तेसाठी कधीही लाचार होणार नाही, तसेच उगाचच कुणाची तरी पालखीही वाहणार नाही. त्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही. पायात फटाके जोडे असले तरी चालत जाऊ. पण स्वाभिमानाने चालत जा . शिवसेना हा पक्ष नाही तर विचार आहे, हा विचार पुढे कायम राहील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
(हेही वाचा : शिवसेना म्हणजे देशात हिंदुत्व, राज्यात मराठी! )
सेनेचे राजकारण हे हपापले असते, तर शिवसेना टिकली नसती!
शिवसेना भवनासमोर शिवसेना-भाजप यांच्यात झालेला राड्याच्या पार्श्वभूमीवर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले कि, सध्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची क्लिप सर्वत्र फिरते. शिवसेनाप्रमुख त्यात म्हणतात कुणी आपल्याला फटका मारला तर त्याला अशी मारा कि खाड्कन आवाज येईल. पण शिवसैनिकांची खून-खराबा करणे ही ओळख नाही. ९२-९३ ला शिवसैनिक रस्त्यावर उतरला नसता तर मुंबई वाचली नसती हे खरे आहे, पण शिवसैनिकांची रक्तदान करणारा अशीही ओळख आहे. शिवसैनिकाने दिलेले रक्त मराठी माणसाला मिळते कि अमराठी मराठी, हिंदू कि अन्य धर्मियांना मिळते हे आम्ही पाहत नाही. पण नुसते बदनाम करण्यासाठी आरोप केले जात आहेत. सेनेचे राजकारण हे हपापले असते, तर शिवसेना टिकली नसती. शिवसेना आजही एक – एक पाऊल पुढे जात आहे. अनेक पक्षाचे रंग आणि अंतरंगही शिवसेनेने पाहिले गेल्या 55 वर्षांचे राजकारण पाहिले. राजकारणात जे काय चालले ते आपल्याला कळते आहे. सरकारच्या कामामुळे काहींना पोटदुखी झाली. सत्ता नाही म्हणून काहींचा जीव कासावीस होत आहे, पण त्यांचे ते बघतील. त्यांच्या दुखण्याला इलाज करायला मी काही डॉक्टर नाही. पण जेव्हा वेळ येईल तेव्हा मी राजकीय औषध देईल, असे म्हणत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापनदिनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.कोरोना काळातही सुरू असलेले राजकारण म्हणजे राजकारणाचे विकृतीकरण आहे. अनुभव नसतानाही मी आव्हान स्कीकारले. या कामाबद्दल माझे कौतुक होत आहे, पण तुमच्या सहकार्याशिवाय ते काम करणे शक्य नव्हते. कोरोना काळात प्रशासनाने मोठी मेहनत केली आणि जनतेनेही मोठे सहकार्य केले, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केल्यापासून भाजपकडून सातत्याने हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला लक्ष्य करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंनी भाजपला सडेतोड उत्तर दिले.
Join Our WhatsApp Community