भाजपला याची मोठी किंमत मोजावी लागेल… राणे-भाजपविरुद्ध शिवसेनेचा जंगी ‘सामना’

कायद्याचे राज्य असलेल्या महाराष्ट्रात भाजपची ही बेताल बादशाही खपवून घेतली जाणार नाही.

119

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाली. मंगळवारी रात्री उशिरा त्यांना जामीन मंजूर झाला. एकंदरीतच राणेंची ही जन आशीर्वाद यात्रा वादग्रस्त ठरत असताना, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून राणेंवर बोच-या शब्दांत टीका करण्यात आली आहे. सामनाच्या अग्रलेखातून राणे म्हणजे भोकं पडलेला फुगा आहे, असं म्हणत त्यांना रंग बदलणा-या सरड्याची उपमा देत राणेंवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. तसेच भाजपला याची किंमत मोजावी लागेल, असा इशाराही सामनामधून देण्यात आला आहे.

हवा गेलेला फुगा

मुख्यमंत्र्यांवर हात उगारण्याचे विधान केल्यानंतर मंगळवारी शिवसैनिकांनी नारायण राणेंचा निषेध व्यक्त केला. त्यांना कोंबडीचोर म्हणत, आक्षेपार्ह भाषा देखील वापरण्यात आली. तसेच बुधवारच्या सामनाच्या अग्रलेखातूनही राणेंना बेडूक, भोकंवाला फुगा, सरडा अशा उपमा देण्यात आल्या आहेत. नारायण राणे हे कर्तबगार कधीच नव्हते. ते सत्तेच्या शिडी चढता आली ती केवळ शिवसेन या चार अक्षरांमुळेच. शिवसेना सोडल्यानंतर त्यांचा लोकसभेत आणि विधानसभेत शिवसेनेने दारुण पराभव केला. त्यामुळे राणेंचे वर्णन भोकं पडलेला फुगा असेच करावे लागेल. हा फुगा कितीही फुगवला तरी वर जाणार नाही, अशा शब्दांत सामनातून राणेंवर आगपखड करण्यात आली आहे.

(हेही वाचाः नारायण राणेंना अखेर जामीन मंजूर)

राणेंची भाषा छपरी गँगस्टरची

मी नॉर्मल माणूस नाही, असे राणे यांनी स्वतःच जाहीर केले आहे. त्यामुळे ते अ‍ॅबनॉर्मल आहेत का, याचाही तपास करावा लागेल, अशी टीकाही सामनातून करण्यात आली आहे. कोणताही गुन्हा केला तरी आपण कायद्याच्या वर आहोत, असे सध्या राणेंना वाटत आहे. केंद्रीय मंत्रीपदाची झूल पांघरुनही राणे मारहाण करण्याची, एखाद्या छपरी गँगस्टरप्रमाणे भाषा करत आहेत. मुख्यमंत्र्यांविषयी ही भाषा वापरणे म्हणजे 105 हुतात्म्यांच्या भावनांना लाथ मारण्यासारखे आहे, असा झणझणीत प्रहार सामनातून करण्यात आला आहे.

सरडा लाजेल इतके रंग राणेंनी बदलले

राणेंसारख्या किरकोळ व्यक्तीस शिवसेनेने मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवले. पण त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. शिवसेना सोडून 20 वर्षे झाली तरी त्यांचे शिवसेनाद्वेषाचे तुणतुणे आजही चालूच आहे. सरडाही लाजेल इतके रंग या काळात राणेंनी बदलले. ठाकरे आणि शिवसेना यांच्यावर चिखलफेक करण्याचे एकच काम या काळात त्यांनी केले, असे देखील अग्रलेखात म्हटले आहे.

(हेही वाचाः दोन दिवसांत झाली शिवसेनेला राणेंची ओळख)

भाजपवाल्यांची डोकी कामातून गेली आहेत

शिवसेनेवर चिखलफेक करणा-यांवर भाजपने मंत्रीपदाची उधळण केली आहे. पण नको त्या माणसांना सत्तेची दारू पाजल्याने कोणत्या प्रसंगांना सामोरे जावे लागते, त्याचा अनुभव आता भाजप घेत आहे. राज्यातील सत्ता गेल्यापासून भाजपवाल्यांची डोकी कामातून गेली आहेत. त्यामुळे ते आकांडतांडव करत असल्याची टीका भाजपवर सामनामधून करण्यात आली आहे.

राणेंना अती ‘सूक्ष्म’ पद

शिवसेनाद्वेषाचे इनाम म्हणून भाजपने राणेंना केंद्रात सूक्ष्म उद्योग मंत्रीपद दिले. हे खाते इतके सूक्ष्म आहे की, त्यांच्या वाट्याला लाल दिव्याच्या गाडीशिवाय काहीच लागलेले नाही. त्यामुळे शिवसेनेवर चिखलफेक करण्याचे जुने उद्योग त्यांनी सुरू ठेवले आहेत.

(हेही वाचाः पोलिसांनी राणेंना भरल्या ताटावरुन उठवले)

भाजपला मोठी किंमत मोजावी लागेल

राज्यातील भाजप नेते राणेंना पाठींबा असल्याचे म्हणत आहेत. पण राणेंचा पूर्वेतिहास पाहता मोदी-शहांनी मात्र त्यांचे विधान गांभीर्याने घेतले पाहिजे. पंतप्रधानांच्या बाबतीत कुणी विधान केले असते तर एव्हाना त्याला देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात डांबले असते. राणेंचा गुन्हाही तसाच आहे. कायद्याचे राज्य असलेल्या महाराष्ट्रात भाजपची ही बेताल बादशाही खपवून घेतली जाणार नाही. भाजपला या बेताल बादशाहीची मोठी किंमत मोजावी लागेल, असा आक्रमक इशाराही सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.