भाजप नगरसेवकांना डॅमेज करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न!

भाजपचे नगरसेवक असलेल्या भागांमध्ये कायमस्वरुपी सहायक आयुक्त नेमण्याऐवजी त्या रिक्तपदाचा भार दुसऱ्या विभागाच्या सहायक आयुक्तांवर अतिरिक्त कार्यभार म्हणून सोपवण्यामागे मोठे राजकारण असल्याचे बोलले जात आहे.

147

मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला रोखण्याची रणनीती शिवसेनेकडून आखली जात असतानाच आता या पक्षाच्या नगरसेवकांच्या कामांमध्येच खोडा निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी प्रशासनाला हाताशी धरुन केल्याचे दिसून येत आहे. भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेल्या विभागांना यासाठी शिवसेनेने टार्गेट केले आहे. अशा विभागांमधील सहायक आयुक्तांच्या रिक्त जागा न भरता त्या विभागाचा अतिरिक्त कार्यभार बाजुच्या सहायक आयुक्तांवर सोपवून भाजपच्या नगरसेवकांची कामे विलंबाने होतील, याची खबरदारी घेतली जात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

पावसाळ्यात बदल्या करूनही ‘त्या’ विभागांकडे दुर्लक्ष!

मुंबईत आधीच कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे, त्यात पावसाळा सुरु असल्याने अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. परंतु अशा प्रसंगी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सहा सहायक आयुक्तांच्या बदल्या करून चार विभागांमधील रिक्त जागी कार्यकारी अभियंत्यांवर या पदाची जबाबदारी सोपवली आहे. अधिकाऱ्यांची तीन वर्षे पूर्ण झाल्याचे दाखले देत आयुक्तांनी ही बदली केली. परंतु कोरोनासारखी आणीबाणीची परिस्थिती आहे. त्यातच पावसाळ्यात कोणाचीही बदली करण्याची महापालिकेची प्रथा नाही. तरीही आयुक्तांनी या बदली करताना महत्वाच्या विभागांमधील या पदांवर सहायक आयुक्तांची नेमणूक केलेली नाही.

एवढ्या मोठ्या विभागाला महापालिका आयुक्तांना एक कायमस्वरुपी सहायक आयुक्त देता येत नाही. दुसऱ्या विभागाला सहायक आयुक्त नेमला जात आहे, पण बोरिवलीला दिला जात नाही. याचे कारण काय? भाजपचे नगरसेवक आहेत म्हणून. अतिरिक्त कारभार दिला तरी आम्हाला त्यांना भेटण्यासाठी दहिसरलाच जावे लागणार आहे. ते आमच्या विभागाला किती वेळ देणार? त्यामुळे कापसे मॅडम यांना बढती मिळाल्यानंतर हे पद रिक्त असून आताच त्याची झळ आम्हाला बसते. त्यामुळे हे सर्व मुद्दाम तर केले जात नाही ना, असा मला प्रश्न पडतो.
– आसावरी पाटील, भाजप नगरसेविका, आर मध्य विभाग

(हेही वाचा : बोरिवली रेल्वे स्थानकाबाहेर भाजपचे ‘लोकल’ आंदोलन!)

‘या’ विभागांना केले लक्ष्य

महापालिकेच्या बोरिवली आर मध्य विभाग, चेंबूर, टिळक नगर, एम पश्चिम विभाग आणि मुलुंड टि विभाग या तीन विभागांपैकी आर मध्य व एम पश्चिम विभागाचा अतिरिक्त कार्यभार सहायक आयुक्त मृदुला अंडे आणि विश्वास मोटे यांच्यावर सोपवला. तर टि विभागाचा भार कार्यकारी अभियंत्यावर सोपवला आहे. विशेष म्हणजे या तिन्ही विभागांमध्ये भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भाजपच्या नगरसेवकांनी प्रस्तावित केलेल्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता न मिळता ती रखडली जावी, त्यांना विलंब  व्हावा हाच हेतू असल्याचे बोलले जात आहे.

मुळात टि विभागाच्या सहायक आयुक्तांची बदली का केली, तर त्यांना तीन वर्षांहून अधिक काळ झाला होता. पण त्यांची बदली कुठे झाली तर अतिक्रमण निर्मूलन विभागात. सध्या या विभागाची काय गत आहे हे सर्वांनाच माहित आहे. जर तुमच्याकडे माणूस नव्हता, तर या विभागाच्या सहायक आयुक्तांची बदली का केली? यामुळे या विभागाची चांगली बसलेली घडी विस्कळीत केली गेली. म्हणूनच या बदल्यांबाबत संशय निर्माण होतो. या बदल्या मुंबईच्या हितासाठी झालेल्या नसून त्या राजकीय सोयींसाठीच झाल्या आहेत.
-प्रभाकर शिंदे, भाजप गटनेते व नगरसेवक, टि विभाग

भाजपच्या नगरसेवकांना कमजोर करण्याचा डाव

भाजपचे महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सहायक आयुक्तांच्या बदल्या या मुंबईच्या सोयीसाठी केल्या जातात की राजकीय सोयीसाठी, असा सवाल उपस्थित केला होता. त्यामुळे भाजपचे नगरसेवक असलेल्या भागांमध्ये कायमस्वरुपी सहायक आयुक्त नेमण्याऐवजी त्या रिक्तपदाचा भार दुसऱ्या विभागाच्या सहायक आयुक्तांवर अतिरिक्त कार्यभार म्हणून सोपवण्यामागे मोठे राजकारण असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या तिन्ही विभागांना कायमस्वरुपी सहायक आयुक्त नसल्याने या विभागातील नगरसेवकांनाही विकासकामांना परवानगी घेण्यासाठी बाजूच्या विभागांमध्ये फेऱ्या माराव्या लागणार आहे. परिणामी त्यांची कामे वेळेवर होणार नाही. फेब्रुवारी २०२२ रोजी निवडणुका होणार असल्याने नगरसेवक निधीतून कामे जलदगतीने न झाल्यास त्याचा फटका नगरसेवकांना बसू शकतो. याच हेतूने भाजपच्या नगरसेवकांना कमजोर करण्याचा डाव प्रशासनाला हाताशी धरून शिवसेनेकडून सुरु असल्याचे बोलले जात आहे. या बदल्या करण्यापूर्वी मालाड पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्तपद आठ ते नऊ महिने रिक्त ठेवले होते. या मालाडमध्ये सर्वाधिक नगरसेवक भाजपचे आहेत. परंतु याबाबत भाजपच्या नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेवून सहायक आयुक्तपद भरण्याची मागणी केली होती. परंतु आयुक्तांनी हे पद भरले जाईल, असे सांगत ९ महिने रेटून नेले. तोपर्यंत गोरेगाव पी दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्तांवर पी उत्तर विभागाचा अतिरिक्त कार्यभार होता. त्यानंतर आता या विभागाला मकरंद दगडखैर यांची ई विभागातून इथे बदली केली. त्यामुळे आधी मालाडपासून भाजप नगरसेवकांना कमजोर करण्याचा प्रयत्न सुरु झाल्यानंतर आता आणखी तीन विभागांमध्ये हा प्रकार सुरु करून कोणत्याही परिस्थितीत त्यांना डॅमेज कंट्रोलमध्ये आणायचा डाव सत्ताधारी पक्षाचा असल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचा : ‘तो’ आत्महत्येसाठी प्रवृत्त करणारा व्हिडिओ बनवतो! रेल्वेने घेतली गंभीर दखल)

पी उत्तर विभागाला मागील ९ महिन्यांपासून सहायक आयुक्त नव्हते. त्यामुळे आम्हाला आमची कामे करून घेण्यासाठी पी दक्षिण विभागात जावे लागायचे. त्याचा परिणाम आमच्या कामांवर झालेला असून प्रशासकीय मान्यता मिळण्यात आलेल्या अडचणींमुळे अनेक नगरसेवकांची कामे नियोजित वेळेत होवू शकलेली नाही. त्यामुळे पी उत्तर विभागात केलेला प्रयोग यशस्वी झाल्याने सत्ताधारी पक्षाने हा प्रयोग टि, एम पश्चिम आणि आर मध्य विभागात केला की काय? कारण या विभागांमध्ये भाजपचे नगरसेवक सर्वाधिक आहेत.
– दक्षा पटेल, भाजप नगरसेविका, पी उत्तर विभाग

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.