दादरमधील शिवसेनेचे बॅनर काढले कुणी?

113

दादर-माहिममधील शिवसेनेचे विभागप्रमुख आमदार सदा सरवणकर शिवसेना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाले. तेव्हापासून शिवसेना आणि शिंदे गट यांच्यामध्ये अस्तित्व सिध्द करण्यास सुरुवात झाली असून शिंदे यांनी आता संपूर्ण दादर व माहिममध्ये बॅनरवरूनही शिवसेनेचे अस्तित्व संपवून टाकले आहे. संपूर्ण मतदार संघात शिंदे गटाचे व भाजपचेच बॅनर लागलेले असतानाच रानडे व गोखले रोड जंक्शनवर लागलेले शिवसेना शाखा क्रमांक १९१चे बॅनरही शनिवारी, 3 सप्टेंबर रोजी सकाळी काढण्यात आले. हे बॅनर महापालिकेने दबावाखातर काढल्याचे चित्र निर्माण केले असले तरी प्रत्यक्षात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीच हे बॅनर काढल्याने कुठे तरी शिंदे गटाला बदमान करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरु तर नाही ना, असा सवाल उपस्थित होत  आहे.

वरळीत वातावरण बिघडवत असल्याचा आरोप

दादरमधील शिवसेनेचे एकमेव लावलेले बॅनर शनिवारी काढण्यात आले, तर वरळीतही ठाकरे आणि शिंदे गटात पोस्टरबाजीवरून वातावरण तापले आहे. शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी अभिजित पाटील यांनी वरळी सागरी कोळी महोत्सव समितीच्या माध्यमातून गणेश भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी कृत्रिम तलावाच्या ठिकाणी लावलेले फलक काढून शिंदे सरकारचे फलक लावण्यात आले आहे. शिंदे सरकारच्या वतीने लावण्यात आलेल्या या फलकावर बीडीडी चाळीतील पोलिसांना मालकी हक्काची घरे ५० ऐवजी १५ लाखांत मिळणार अशाप्रकारच्या सरकारचे आभार मानणारे बॅनर लावण्यात आले आहे. शिंदे सरकारने बॅनर हटवल्याने स्थानिक पोलिस सहायकांकडे तक्रार नोंदवण्यात आली असून उत्सव काळात शिंदे गट वरळीत वातावरण बिघडवत असल्याचा आरोप केला आहे.

(हेही वाचा हिंदुत्वामध्ये हाती कमळ असलेल्या स्त्रिला महालक्ष्मी म्हणतात, कमळाबाई नाही!)

दादरमध्येही बॅनरवाॅर

वरळी पाठोपाठ दादरमधील प्रभाग क्रमांक १९१ व्यावतीने गणेश भक्तांना शुभेच्छा देणारे रानडे मार्ग जंक्शनवरील बॅनर हटवण्यात आले आहे. या बॅनरवर माजी सभागृह नेत्या विशाखा राऊत आणि शाखा प्रमुख अजित कदम यांची छायाचित्रे होती. एका बाजुला भाजपसह शिंदे गटाचे सर्व बॅनर असतानाच शिवसेनेचे हे बॅनर काढल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. हे बॅनर काढून अप्रत्यक्ष शिंदे गटावर बॅनर हटवल्याचा आरोप करण्याचा प्रयत्न सुरु असून महापालिकेने मात्र, शनिवारी दिवसभरात महापालिकेच्यावतीने एकही बॅनर काढले नसल्याचा दावा केला आहे. शिवसेनेचे शाखा प्रमुख अजित कदम यांनी आपल्याला याबाबत कल्पना नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शिवसेनेचे बॅनर काढले कोणी, असा सवाल उपस्थित होत आहे. परंतु शिवसेनेचे बॅनर हटवताना शिवसेनेचे पदाधिकारी असल्याचे काही स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शिंदे गटाला टार्गेट करण्यासाठी शिवसेनेने हे बॅनर हटवले की काय, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.