भाजपला शिवप्रसाद मिळाला, शिवभोजन देण्याची वेळ आणू नका! 

आमच्याकरता शिवसेना भवन हे पक्षाचे मुख्यालय नाही तर मंदिर आहे. त्यामुळे त्यावर कुणी वाकड्या नजरेने पाहणार असेल, तर सत्ता असो वा नसो त्यांना असेच उत्तर दिले जाईल, असे संजय राऊत म्हणाले.

हुतात्मा स्मारकाकडे ज्या अस्मितेने पाहिले जाते, तसेच शिवसैनिक आणि मराठी माणूस हा शिवसेना भवनाकडे पाहतो. त्यावर हल्ला करण्याचा भाजपच्या कार्यकर्त्यांचा हेतू होता, त्यामुळे शिवसैनिकांनी त्यांना शिवप्रसाद दिला. हा विषय आता इथेच थांबला आहे. यापुढे शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू देऊ नका, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला.

सेनाभवनावर वाकड्या नजरेने पाहिल्यास असेच उत्तर! 

आमच्याकरता शिवसेना भवन हे पक्षाचे मुख्यालय नाही तर मंदिर आहे. त्यामुळे त्यावर कुणी वाकड्या नजरेने पाहणार असेल, तर सत्ता असो वा नसो त्यांना असेच उत्तर दिले जाईल, असेही संजय राऊत म्हणाले. शिवसेनेने काय भूमिका मांडली, ही भाजपला समजत नाही का?  श्रीराम मंदिर हा विषय समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे या मंदिराच्या ट्रस्टवर आरोप होणार असेल, तर त्याची चौकशी व्हावी. त्यात जर आरोप खोटा ठरला तर आरोप करणाऱ्यांवरही कारवाई करावी, असेही शिवसेनेने म्हटले आहे. त्यात गैर काय? खुलासा मागण्याचा सर्वांना अधिकार आहे. ही ट्रस्ट स्वायत्त आहे. त्यावर भाजपचा अध्यक्ष आहे का? आरोप ट्रस्टवर झाला आहे, खुलासा ट्रस्ट करणार आहे, त्यात भाजपाला वाईट वाटण्याची गरज काय, असेही राऊत म्हणाले.

(हेही वाचा : प्रदीप शर्मांच्या घरावर एनआयएचा छापा! )

राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र लढणार! 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे निवडणुका स्वबळावर लढण्याचा वारंवार नारा देत आहेत. भाजप स्वबळावर निवडणूक लढणार आहे. मग उरले फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना. हे दोन्ही पक्ष निवडणूक एकत्र लढणार आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.

प्रदीप शर्मा प्रकरणी माहिती नाही! 

अंबानी स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रक्ररणी माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरावर एनआयएने छापा मारला आहे. याप्रकरणी मात्र कोणतेही भाष्य करण्यास राऊत यांनी टाळले. आपल्याला याविषयी माहिती नाही, असे राऊत म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here