शिवसेना नगरसेवकांचे नाबाद शतक: या नगरसेविकेच्या येण्याने पूर्ण झाले शतक

152

मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या आता १०० पार झाली आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांच्या संख्येत आणखी एकाची भर पडली. शिवसेनेची एक संख्या वाढताना प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपची संख्याही एकने कमी झाली आहे. कुर्ला-घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक १५९चे भाजप नगरसेवक प्रकाश देवजी मोरे यांचे महापालिका सदस्यत्व रद्द झाल्याने दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेच्या कोमल कमलाकर जामसंडेकर यांची महापालिका सदस्य म्हणून महापालिका सभागृहात घोषणा करण्यात आली. त्यामुळे जामसंडेकर या आता केवळ आठ दिवसांच्या नगरसेविका बनल्या आहेत. यापूर्वी गौतम साबळे हे एक दिवसाचे नगरसेवक बनले होते.

जामसंडेकर यांनी तक्रार केली

मुंबई महापालिकेच्या २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत कुर्ला एल विभागातील प्रभाग क्रमांक १५९मधून भाजपचे प्रकाश देवजी मोरे ६,२०२ मते मिळवत विजयी झाले होते. या निवडणुकीत शिवसेनेच्या माजी नगरसेविका कोमल कमलाकर जामसंडेकर यांना ४,२२८ मते मिळाली होती. मात्र मोरे यांनी जातप्रमाणपत्रामध्ये दिलेल्या खोटी माहितीच्या आधारे जामसंडेकर यांनी तक्रार केली होती. त्यानुसार यावर न्यायालयात प्रकरण सुरु होते. यावर मागील आठवड्यात सुनावणी देत मोरे यांचे महापालिका सदस्यत्व रद्द करण्याचा निकाल दिला गेला. त्यानुसार दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेना उमेदवार कोमल जामसंडेकर यांनी महापौर आणि आयुक्तांकडे पत्रव्यवहार केल्यानंतर मागील २८ फेब्रुवारी रोजी मोरे यांचे महापालिका सदस्यत्व रद्द करून त्यांच्या जागी जामसंडेकर यांचे महापालिका सदस्यत्व म्हणून घोषणा केली.

(हेही वाचा धक्कादायक! युक्रेन भारतीय विद्यार्थ्यांचा ढाल म्हणून करतेय वापर!)

सलग तिसऱ्यांदा नगरसेवक बनवण्याचा मान

सन फेब्रुवारी २००७च्या निवडणुकीत शिवसेना कमलाकर जामसंडेकर हे विजयी झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत प्रथम कोमल जामसंडेकर या निवडून आल्या होत्या. त्यानंतर सन २०१२च्या निवडणुकीतही त्या विजयी झाल्या होत्या. तर आता मोरे यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे महापालिका सदस्यत्व रद्द करण्यात आल्याने त्यांच्या जागी आठ दिवसांकरता निवड झाल्याने सलग तिसऱ्यांदा नगरसेवक बनवण्याचा मान जामसंडेकर यांना मिळाला आहे.

शिवसेनेच्या नगरसेवकांची एकूण संख्या १०० एवढी झाली

सध्या शिवसेनेचे ९७ नगरसेवक असून दोन नामनिर्देशित नगरसेवकांसह ही संख्या ९९ एवढी होती. आता त्यात जामसंडेकर यांच्या रुपाने अजून वाढ झालेली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांची एकूण संख्या १०० एवढी झाली आहे. सन २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचे ८४ नगरसेवक निवडून आले होते आणि चार अपक्षांनी पाठिंबा तसेच पक्षात प्रवेश केल्यामुळे ही संख्या ८८ एवढी होती. परंतु त्यानंतर मनसेचे सहा नगरसेवकांनी केलेला प्रवेश, जातप्रमाणपत्र पडताळणीमध्ये तसेच पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेचे दहा नगरसेवक वाढले गेले आहे. त्यातुलनेत भाजपचे ८२ नगरसेवक निवडणून आले होते आणि अभासे आणि अपक्षांच्या पाठिंब्याने ही संख्या ८४ एवढी झाली होती, जी संख्या आता दोन नामनिर्देशित सदस्यांसह ८३ ही, जी आता एकने कमी होत ८२ एवढी झाली आहे. त्यातच डॉ. राम बारोट आणि सुनील यादव या भाजप नगरसेवकांचे निधन झाले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.