भाजपाचे नगरसेवक फोडण्याचा मुहूर्त जाहीर!

भाजपचे महापालिकेतील नगरसेवक त्रस्त आहेत, असे यशवंत जाधव म्हणाले.

86

भाजपच्या पालिकेतील वरीष्ठ नेत्यांच्या मनमानी कार्यपद्धतीमुळे भाजपचे अनेक नगरसेवक अक्षरश: कंटाळले आहेत. त्यामुळे आपले नगरसेवक फुटण्याच्या धसक्यानेच शिवसेनेवर बेछूट आरोप करत असल्याचा घणाघात स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला आहे. भाजपचे अनेक नगरसेवक शिवसेना नेत्यांच्या संपर्कात असून डिसेंबरमध्ये भाजपला खिंडार पडेल, असे भाकित करत यशवंत जाधव यांनी भाजपचे नगरसेवक फोडण्याचा मुहूर्त जाहीर करून टाकला.

तेव्हा भाजपचे नगरसेवक, नेते मूग गिळून गप्प का बसले होते?

भाजपने ‘आश्रय’ योजनेत १८४४ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. या आरोपाची दखल घेत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हे केलेला आरोप सिद्ध करून दाखवाचेच, असे आव्हान भाजपला दिले आहे. शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात ३०० ते ६०० चौरस फुटांची हजारो घरे बांधली जाणार आहेत. याबाबतचे प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूरही झाले आहे. विशेष म्हणजे स्थायी समितीत हे प्रस्ताव मांडले जात असताना भाजपचे नगरसेवक, नेते मूग गिळून गप्प का बसले होते, असा सवालही स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला आहे.

(हेही वाचा : सेनेचा दसरा मेळावा की निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले?)

डिसेंबरपर्यंत थांबा भाजपचे नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करतील

सफाई कामगारांना कामाच्या ठिकाणापासून जवळ घर मिळावे यासाठी गेल्या चार वर्षांपासून शिवसेनेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. अखेर हा प्रश्न आता मार्गी लागला आहे. यामध्ये मुंबई शहरात १,१२१, पश्चिम उपनगरात १,४९९ आणि पूर्व उपनगरात १,३८६ अशी एकूण ४,००६ घरे बांधली जाणार आहेत. याबाबतचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेनेच सफाई कामगारांना न्याय दिला असल्याचेही यशवंत जाधव म्हणाले. भाजपचे महापालिकेतील नगरसेवक त्रस्त आहेत. आपले नगरसेवक फुटू नयेत यासाठी त्यांना वरीष्ठ नेत्यांकडून धमकावले जात आहे. त्यातूनच केवळ राजकारण करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप केले जात असून एक सांगतो की, डिसेंबरपर्यंत थांबा भाजपचे नगरसेवक शिवसेनेत प्रवेश केल्याचे पाहायला मिळतील,असेही जाधव यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.