शिवसेनेची मैदानात धाव!

भाजप नगरसेवकांनी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यावर भर दिला आहे.

मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी २०२२पर्यंत होण्याची शक्यता असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मैदानात धाव घेतली आहे. आगामी निवडणुकीत मैदान कोण मारुन नेणार, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. शिवसेनेने त्यासाठी मैदाने स्वच्छ करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्याकरता पावसाळ्यात वाढलेले गवत कापून मैदानाला पुन्हा रंगरंगोटी करण्याचे सेनेचे प्रयत्न सुरु झाले आहे. मात्र, दुसरीकडे भाजप नगरसेवक रस्त्यावर उतरुन खड्डे बुजवण्याचे प्रयत्न करत आहेत.

शिवाजी पार्कसाठी शिवसेनेच्या नगरसेविकेचा पुढाकार 

पावसाळा आता संपत आल्याने मागील चार महिन्यांपासून विविध खेळांसाठी वापर होणाऱ्या मैदान आणि क्रीडांगणांची दुरवस्था झाली आहे. अनेक खेळाची मैदाने आणि क्रीडांगणांमध्ये गवत वाढलेले असून चिखलामुळे जमीनही असमतल झाली आहे. त्यामुळे मैदान आणि क्रीडांगणांच्या जागेतील वाढलेली गवत आणि झाडेझुडपे काढण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेविकांनी पुढाकार घेतला आहे. दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क अर्थात शिवाजी पार्कमधील फुटबॉल खेळण्याच्या जागेवर असलेले गवत कापून घेण्यासाठी शिवसेना स्थानिक नगरसेविका व सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी पुढाकार घेतला आहे. येथील गवत कापण्यास येणाऱ्या अडचणी लक्षात घेत विशाखा राऊत यांनी जेसीबी उपलब्ध करून दिला. त्यानंतर जेसीबीच्या माध्यमातून येथील गवत काढून टाकत फुटबॉल खेळण्यासाठीचे मैदान चांगल्याप्रकारे बनवून देण्याचा प्रयत्न होत आहे.

(हेही वाचा : भाजपातील ‘या’ नेत्यांची राष्ट्रीय पातळीवर नियुक्ती!)

भाजप नगरसेवकांचा रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यावर भर

त्याबरोरबच माजी महापौर श्रध्दा जाधव यांनी शिवडीतील प्रबोधनकार ठाकरे मैदान हे रोलरच्या माध्यमातून पुन्हा सपाट करून दिले आहे. पावसाळ्यात याठिकाणी चिखल जमा झाल्याने मैदान असमतल बनले होते. त्यामुळे त्यांनी हे तात्काळ सपाटीकरण करून दिले आहे. दादर पूर्व येथील शंकर आबाजी पालव मार्ग येथील भवानी माता क्रीडांगणातील मैदानही स्थानिक नगरसेविका उर्मिला पांचाळ यांच्या प्रयत्नाने सपाट करण्यात आले आहे. या मैदानाच्या भिंतींचीही रंगरंगोटी करत पुन्हा या मैदानाला मूळ रुप देण्यात आले आहे. एका बाजुला शिवसेनेच्या नगरसेवकांनी मैदानात धाव घेतलेली असताना भाजपा नगरसेवकांनी रस्त्यांवरच आपले लक्ष केंद्रीत केले आहे. रस्त्यावरील खड्डे ही आजही मोठी समस्या असून भाजप नगरसेवकांनी रस्त्यांवरील खड्डे बुजवून घेण्यावर भर दिला आहे. कांदिवलीतील भाजप नगरसेविका सुनीता यादव यांनी कांदिवलीतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी प्रयत्न केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here