आधी सोनूवर टीका, आता पाठिंबा! शिवसेनेची दुहेरी भूमिका 

कोरोनाच्या पहिल्या लाटेत सोनू सूदने परप्रांतीय मजुरांना मदत केल्यावर सेनेने 'सोनू हा भाजपाचा मोहरा आहे', अशी टीका केली होती.

मागील २ दिवसांपासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभिनेता सोनू सूदच्या संपत्तीचे सर्वेक्षण सुरु आहे. त्यावरून देशभरात चर्चेला उधाण आले. यातून मोदी सरकारला लक्ष्य केले जात आहे. सोनू हा दिल्लीतील आप सरकारच्या योजनेचा ब्रँड अँबेसिडर बनल्याने ही आकसापोटी कारवाई होत असल्याचा आरोप होत आहे. त्यात आता शिवसेनाही सहभागी झाली आहे. हा रडीचा डाव आहे, एक दिवस उलटल्याशिवाय राहणार नाही, असे शिवसेनेनेचे मुखपत्र सामानाच्या संपादकीयातून म्हटले आहे. परंतु याच शिवसेनेने कोरोनाच्या पहिल्या लाटेत जेव्हा सोनू मुंबईतील परप्रांतीय कामगारांना बस गाड्या भरून त्यांच्या त्यांच्या गावी पाठवत होता, तेव्हा तो सरकारपेक्षा वरचढ दिसत होता, त्यावेळी मात्र ‘सोनू भाजपचा मोहरा आहे’, असे सांगत टीका केली होती. त्या सेनेने आता सोनूची पाठराखण करण्यासाठी त्याच कोरोना काळातील संदर्भ घेत स्वतःची त्यावेळीची विरोधी भूमिका सोयीस्कर बाजूला ठेवत भाजपाला लक्ष्य केले आहे. त्यामुळे सोनूच्या बाबतीत सेनेच्या भूमिकेत इतका बदल कसा झाला, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

सेना म्हणते, भाजपासाठी सोनू तेव्हा मसीहा होता!  

शिवसेनेची भारतीय जनता पक्ष हा जगभरात सर्वाधिक सदस्य असलेला पक्ष आहे. मोठय़ा राजकीय पक्षाचे मनही मोठे असायला हवे. महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या मागे खोटे आरोप लावणे, राज्यपालांनी वरच्या दबावामुळे १२ आमदारांची नियुक्ती रोखणे, सोनू सूदसारख्यांवर आयकर धाडी घालणे हे कोत्या मनाचे लक्षण आहे, हे रडीचे डाव आहेत. त्या डावांचा पोरखेळ एक दिवस उलटा पडल्याशिवाय राहणार नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी सोनू सूद भलत्याच झोतात आला. गोरगरीबांचा मसीहा, मुंबईतून परराज्यांत जाणारे मजूर वगैरे लोकांचा आधारस्तंभ म्हणून त्याचा बोलबाला सुरू झाला. बसेस, ट्रेन्स, विमाने बुक करून सोनू सूद मुंबईत अडकलेल्या लोकांना परराज्यांतील त्यांच्या घरी पाठवीत होता. तेव्हा ‘‘जे सोनूला जमते ते महाविकास आघाडी सरकारला का जमत नाही?’’ असले पाणचट प्रश्न विचारण्यात आले. दुसरे म्हणजे सोनू सूदला खांद्यावर घेऊन मिरवणाऱयांत भाजप पुढे होता. सोनू सूद हा आपलाच माणूस असल्याचे त्यांच्याकडून सतत बिंबविण्यात येत होते, पण या सोनू महाशयांनी दिल्लीच्या केजरीवाल सरकारच्या शैक्षणिक कार्यक्रमाचे ‘ब्रॅण्ड ऍम्बेसेडर’ म्हणून सामाजिक कार्य करायचे ठरवताच त्यांच्यावर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

(हेही वाचा : धक्कादायक! बीकेसीकडील निर्माणाधीन उड्डाणपूल कोसळला!)

काय होती सेनेची याआधीची भूमिका? 

कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊन लागल्यावर मुंबईतील परप्रांतीय मजुरांची उपासमार सुरु झाली. मजुरांनी कुटुंबकबिला घेऊन पायी उत्तर प्रदेश, बिहारचा मार्ग पकडला. त्यावेळी सोनू सूदने या परप्रांतीयांच्या प्रवासाची सोय केली, त्यांना जेवण पुरवले. त्याच्या या कामामुळे ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणावर दोषारोप होऊ लागले. तेव्हा शिवसेना नेते संजय राऊत यांनी, सोनू सूद हा भाजपाचा मोहरा आहे. त्याला ही सर्व कामे करण्यासाठी भाजपा अर्थपुरवठा करत आहे, त्याचा शोध घेतला पाहिजे’, आशा आशयाची टीका केली होती. मात्र आता शिवसेनेने त्याच मुद्द्यांचा आधार घेत उलट भाजपावर टीका केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here