…म्हणून भाजपवर सात वर्षे ‘मोदी-मोदी’ करण्याची वेळ! सेनेचा हल्लाबोल

भाजप देशातील सगळ्यात जास्त निवडणूकग्रस्त पक्ष. वर्षाचे 365 दिवस ते फक्त निवडणुकांचाच विचार करीत असतात, असे शिवसेनेने म्हटले आहे.

76

पंतप्रधान मोदी यांच्याशिवाय भाजपकडे निवडणूक जिंकून देणारा चेहराच नाही. त्यामुळे इतर मोहोऱ्यांनी उगीच फडफड करू नये. सात वर्षांत जनतेचा विश्वास खरोखरच जिंकला असता तर फक्त ‘मोदी मोदी’ करण्याची वेळ पक्षावर आली नसती. भाजप हा कुटुंबकेंद्रित पक्ष नाही. हा पक्ष एखाद्या कुटुंबाच्या हातात नाही असे मोदी यांनी सांगितले. कुटुंबकेंद्रित असणे व व्यक्तिकेंद्रित असणे यात फार फरक नाही. एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू आहेत, अशा शब्दांत शिवसेनेने मुखपत्र ‘सामना’मधून भाजपवर हल्लाबोल केला.

व्यक्ती केंद्रीत पक्ष!

मोदी-शहा यांच्याव्यतिरिक्त आज भाजपमध्ये अन्य कुणाचे बोलणे ऐकले जाते काय? राष्ट्रीय कार्यकारिणी वगैरे हा सर्व मुखवटा आहे. भारतीय जनता पक्षाच्या आजवरच्या जडणघडणीत ज्यांनी हयात घालवली अशा सगळय़ाच ज्येष्ठश्रेष्ठांना आज ‘मार्गदर्शक मंडळा’च्या कोंदणात ‘मानाचे स्थान’ दिले असले तरी हा व्यक्तिकेंद्रित आणि ‘उदो उदो’ राजकीय व्यवस्थेचाच भाग आहे. भारतीय जनता पक्षाची उभारणी व जडणघडण करण्यात आडवाणी यांनी आयुष्य वेचले आहे. अटलबिहारी वाजपेयी आणि आडवाणी यांनी जनतेचा विश्वास सरळ मार्गाने जिंकला होता. कुटुंबाची सत्ता हा वेगळा भाग, पण व्यक्तिकेंद्रित सत्तेचा पट दोन-चार लोकांच्याच हाती असतो व ते त्याचेच कुटुंब असते, अशी शिवसेना म्हणाले.

(हेही वाचा : रुग्णालयांना आगी लागण्यामागे सरकारचा नाकर्तेपणा! काय आहे कारण?)

भाजप सर्वाधिक निवडणूकग्रस्त पक्ष  

पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुका जिंकू म्हणजे जिंकूच, असाच राष्ट्रीय कार्यकारिणीचा सूर होता. पक्षाच्या राष्ट्रीय बैठकीत असे ठरले की, देशात 10 लाख 40 हजार पोलिंग बूथ आहेत आणि 25 डिसेंबरपर्यंत प्रत्येक बूथ स्तरावर भाजपची कमिटी बनवली जाईल. तेथून पंतप्रधानांची ‘मन की बात’ जनतेपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली जाईल. एकंदरीत राष्ट्रीय बैठकीत राजकारण, सत्ता, मोदींचे भजन-कीर्तन याशिवाय काहीच घडले नाही. भाजप हा आपल्या देशातील सगळय़ात जास्त निवडणूकग्रस्त पक्ष आहे. वर्षाचे 365 दिवस ते फक्त निवडणुकांचाच विचार करीत असतात. देशापुढे अनेक प्रश्न आहेत. त्यावर गांभीर्याने चर्चा झाली असती व पंतप्रधान मोदी यांनी त्यावर समारोपाचे मार्गदर्शन केले असते तर देशाला दिशादर्शक ठरले असते, असेही शिवसेनेनं म्हटले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.