मंदिरासाठी बोंबाबोंब म्हणजे ‘दुखणे पोटाला आणि प्लॅस्टर पायाला’!

92

तिसरी लाट जास्त धोकादायक आहे. दहीहंडी व गणेशोत्सवात सावधानता बाळगा, असे केंद्र सरकारनेच ठाकरे सरकारला ‘लेखी’ कळवले आहे. आता तुम्ही दिल्लीतल्या तुमच्या माय-बापांचेही ऐकणार नाहीत का? महाराष्ट्रात ‘घंटा’ बडवताय कशाला? गर्दीवर, सणांवर निर्बंध आणा अशा केंद्राच्याच सूचना आहेत. मग दिल्लीत जाऊन घंटानाद करण्याची हिंमत दाखवत का नाही? महाराष्ट्रातून शिष्टमंडळ घेऊन दिल्लीस जावे व पंतप्रधान, गृहमंत्र्यांना भेटावे. त्यांच्या दारात मंदिर उघडण्यासाठी जागर करावा, पण यांची बोंबाबोंब महाराष्ट्रात सुरू आहे. ‘दुखणे पोटाला आणि प्लॅस्टर पायाला’ त्यातलाच हा प्रकार. केंद्र सरकारने निर्बंधांबाबत पाठवलेल्या खलित्याची होळी करायची की सुरनळी यावरही विरोधकांकडून मार्गदर्शन व्हावे!, अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र दै. सामनाच्या अग्रलेखातून केली.

… तर मंदिरे ओस पडतील!

निर्बंध झुगारून दहीहंडी साजरी करण्याचे शौर्य महाराष्ट्रातल्या काही फुटकळ विरोधी पक्षांनी बजावले आहे. हे पक्ष आज पूर्णपणे अस्तित्वहीन आणि निपचित झाले आहेत. लोकांनी त्यांना निवडणुकांत वारंवार जमीनदोस्त केले, पण विरोधासाठी विरोध या एकमेव अजेंडय़ावर विरोधी पक्ष दोन-चार लोकांना एकत्र करून रस्त्यांवर हंडय़ा फोडत स्वतःचेच हसे करून घेत होता. दुसऱया बाजूला 105 आमदार असलेला प्रमुख विरोधी पक्ष भाजप मंदिरे उघडण्यासाठी घोळके जमवून घंटानाद करू लागला आहे. सगळे काही उघडले, मंदिरे का उघडत नाहीत? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. राळेगणातून अण्णा हजारे यांनीही भाजपच्या सुरात सूर मिसळून मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन पुकारण्याची तुतारी फुंकली आहे. बेमुदत उपोषणाचा इशाराही अण्णांनी दिल्यामुळे बहुधा आपले देवही गोंधळले असतील. माहौल तर असा निर्माण केला जातोय की, ठाकरे सरकार हे हिंदूविरोधी आहे. सण, उत्सवांच्या बाबत ठाकरे सरकार कोरडे आहे. देवदेवळांचे सरकारला काहीच पडलेले नाही, अशा प्रचारी पिचकाऱया कितीही मारल्या तरी त्या पिचकाऱया विरोधकांवरच उलटणार आहेत. विरोधकांचे डोके ठिकाणावर असेल तर त्यांनी आपल्या राज्यातील जनतेचा विचार आधी केला पाहिजे. देव मंदिरांत आहेतच. मूर्तीला पुजले जाते, त्या श्रद्धेतून त्यास देवत्व प्राप्त होते. मनुष्यच जगला नाही, तर मंदिरे कायमचीच ओस पडतील असे भयानक चित्र कोरोनामुळे जगभरात निर्माण झाले आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.

कोरोना एप्रिल २०२२ पर्यंत राहणार!

शहरातील सार्वजनिक ठिकाणी होणाऱया गर्दीबाबत मुंबई उच्च न्यायालयानेही चिंता व्यक्त केली आहे. मुंबईतील गर्दीवर निर्बंध घातले नाहीत किंवा नियंत्रण ठेवले नाही, तर कोरोनाच्या दुसऱया लाटेत या शहराची जी अवस्था झाली होती, त्याची पुनरावृत्ती होईल, ही भीती उच्च न्यायालयाने व्यक्त केली. तिसरी लाट दारात येऊन ठेपली आहे, असे तज्ञांचे मत आहे. एप्रिल 2022 पर्यंत देशाची कोरोनामधून सुटका नाही, असे डॉ. राहुल पंडितांसारखे तज्ञ सांगत आहेत. हे सर्व तज्ञ, उच्च न्यायालय, केंद्र सरकार जे सांगत आहेत ते सर्व मूर्ख आणि बाहेर बोंबा ठोकणारे तेवढे शहाणे? सण, उत्सव साजरे करायला हवेत, पण नियमांचे पालन करून. सरकार सणांच्या नव्हे, तर कोरोनाच्या विरोधात आहे. लढाई कोरोनाच्या विरोधात हवी, पण विरोधकांना मूर्खपणाचे फुरसे चावल्यामुळे त्यांची लढाई सरकारविरोधात आहे. अर्थात विरोधकांना फुरसे चावले म्हणून सरकारने स्वतःचा तोल ढळू देता कामा नये. कारण राज्यातील कोटय़वधी लोकांच्या जिवाचा विचार करून सरकारला पावले उचलायची आहेत, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.