हे तर मोदी सरकारला आलेले शहाणपण! सेनेचा हल्लाबोल 

पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घाईघाईने घेण्यात आला आणि त्यावर दिवाळी गिफ्टचा मुलामा चढविला गेला, असे शिवसेनेने म्हटले आहे. 

केंद्र सरकारने अखेर पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, मोदी सरकारचे हे सर्वसामान्यांना दिवाळी गिफ्ट वगैरे आहे, असे ढोल आता सत्ताधारी मंडळी पिटत आहेत. तेरा राज्यांतील लोकसभा विधानसभा पोटनिवडणुकांत भारतीय जनता पक्षाचे ढोल मतदारांनी फोडले असले, तरी त्यांचे ढोल पिटण्याची हौस काही कमी झालेली नाही. वस्तुस्थिती ही आहे की, या पोटनिवडणुकांतील पराभवामुळेच केंद्रातील सरकारला हे शहाणपण आले आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तील संपादकीय लेखातून टीका करण्यात आली आहे.

‘दिवाळी गिफ्ट’चा मुलामा 

सरकारला इंधन स्वस्ताईची दिवाळी गिफ्टच द्यायची होती तर हा निर्णय दिवाळीच्या पूर्वसंध्येला किंवा त्यापूर्वी का घेतला नाही? पोटनिवडणुकीत पराभवाचे फटके आणि झटके बसले म्हणून सरकारला जाग आली. भयंकर इंधन दरवाढीचे जे चटके सामान्य जनता सहन करीत आहे, त्याची झळ भाजपला बसली. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घाईघाईने घेण्यात आला आणि त्यावर दिवाळी गिफ्टचा मुलामा चढविला गेला, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

(हेही वाचा : अनिल देशमुखांच्या ‘कोठडी’साठी मुलाची ‘चौकशी’?)

केंद्राची इच्छाशक्ती नाही   

पेट्रोलवरील उत्पादन शुल्क ५ रुपयांनी, डिझेलवरील १० रुपयांनी कमी करण्यात आले आहे, अर्थात तरीही पेट्रोल डिझेल प्रतिलिटर परवडणारे नाहीच. महागाईचा वणवा विझेल अशी अपेक्षा करता येणार नाही. म्हणजे पेट्रोल-डिझेलवरील खर्च किंचित कमी होईल, पण सर्वसामान्यांचा रिकामा झालेला खिसा भरला., असे अजिबात होणार नाही. मुळात केंद्राला जर खरंच दिवाळी गिफ्ट द्यायचे होते तर मग सामान्य जनतेचा रिकामा झालेला खिसा कसा भरेल, विझलेल्या चुली कशा पेटतील,अशा पद्धतीने इंधन स्वस्त करायला हवे होते, मात्र तेवढी इच्छाशक्ती केंद्र सरकारने दाखविलेली नाही, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here