मोदींच्या मनात काय चालले शोधणे कठीण! असे का म्हणते शिवसेना?

गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल याना मुख्यमंत्री बनवून ‘मी कोणाचा नाही, माझे कोणी नाही’ हाच संदेश मोदी यांनी दिला आहे, असे शिवसेनेने दै. सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

118

विजय रूपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तेव्हा पुढच्या दोन दिवसांत उपमुख्यमंत्री नितीन पटेल, गोवर्धन जदाफिया, मनसुख मांडवीय, सी. आर. पाटील अशी अनेक नावे चर्चेत आणून मीडियातील चर्वण पद्धतशीर सुरू ठेवले. आपण मोदींच्या जवळ आहोत व मोदींच्या मनात काय चालले आहे हे फक्त आपल्यालाच कळते असे अनेक पत्रकारांना वाटत होते व ते मोदी ‘यालाच’ किंवा ‘त्यालाच’ मुख्यमंत्री करतील असे सांगत होते. भूपेंद्र पटेल यांची मुख्यमंत्रीपदी नेमणूक करून मोदी यांनी या सर्व तथाकथित जवळच्या लोकांना अवाक् केले. ‘मी कोणाचा नाही, माझे कोणी नाही’ हाच संदेश मोदी यांनी दिला आहे, असे शिवसेनेचे मुखपत्र दै. सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

मोदी यांच्या ‘मन की बात’विषयी नेहमीच उत्सुकता असते. ज्या विषयांची कोणालाही कल्पना नसते असे अनेक विषय धुंडाळून मोदी ‘मन की बात’ व्यक्त करीत असतात. अगदी खेळण्यांपासून ते पाळण्यांपर्यंत, पण त्यांच्या मनात काय चालले आहे याचा शोध घेणे कठीण आहे, हे गुजरातच्या मुख्यमंत्री निवडीवरून स्पष्ट दिसले. भूपेंद्र पटेल हे गुजरातचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांचे नाव समोर आले तेव्हा ‘कोण हे महाशय?’ असा प्रश्न बहुतेक सगळय़ांनाच पडला.

(हेही वाचा : प्रवीण दरेकरांची घसरली जीभ! काय दिला राष्ट्रवादीने इशारा?)

हेच मोदी राजकारणाचे तंत्र!

आता भूपेंद्र पटेल कोण? हे गूढच मानायला हवे. ते पटेल समाजाचे आहेत व गुजरातमधील पटेल समाज भारतीय जनता पक्षावर नाराज असल्याने भूपेंद्रभाईंना मुख्यमंत्री केले. तसे पाहिले तर नितीन पटेलांपासून ते प्रफुल पटेल खोडापर्यंत अनेक ज्येष्ठ पटेल नेते तेथे होतेच. आमदारकीची पहिली टर्म आनंदीबेन पटेलांच्या कृपेने मिळवणाऱ्या, शेवटच्या बाकावर बसणाऱ्या भूपेंद्र पटेलांना मुख्यमंत्री करण्याचे कारण काय? पण फार झोतात नसलेल्या लोकांच्या हाती सत्ता देणे हेच मोदी राजकारणाचे तंत्र आहे. गुजरातमध्ये तेच घडले. मोदी यांनी अनेकदा अचानक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. महाराष्ट्रातही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देऊन ‘धक्का’ दिला होता. आता गुजरातमध्येही त्याच ‘धक्कातंत्रा’चा वापर झाला आहे. नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा राजकीय प्रवास नगरसेवक ते मुख्यमंत्री असा आहे. पक्षनेतृत्वाने टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी त्यांना स्वतःला सिद्ध करावे लागेल, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

विकासाचे मॉडेल असलेल्या गुजरातमध्ये तडकाफडकी बदल का? 

गुजरात राज्य जर विकास, प्रगतीच्या मार्गावर पुढे जात होते, तर मग अशा पद्धतीने रातोरात मुख्यमंत्री बदलाची वेळ का आली? याच पद्धतीने उत्तराखंड, कर्नाटकचे मुख्यमंत्रीही काही दिवसांपूर्वी बदलण्यात आले. मध्य प्रदेशातही बदल केले जातील असे संकेत आहेत. फक्त मुख्यमंत्रीच नाही, तर ज्या राज्यांत भाजपची सरकारे नाहीत, तेथेही नेतृत्वबदल होतील असे प्रसिद्ध झाले आहे. कोठे काय बदलायचे हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. भाकरी ही फिरवावीच लागते, पण एखादे राज्य जेव्हा विकास किंवा प्रगतीचे ‘मॉडेल’ असल्याचे आदळआपट करीत सांगितले जाते, तेथे अचानक नेतृत्वबदल घडवला की, मग लोकांच्या मनात शंका निर्माण होतात. भूपेंद्र पटेल यांच्यावर आता गुजरातचा भार पडला आहे. वर्षभरात विधानसभांच्या निवडणुका आहेत. पटेल यांना पुढे करून नरेंद्र मोदी यांनाच लढावे लागणार आहे. गुजरात मॉडेल म्हणायचे ते हेच काय?, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.