याआधी शिवसेनेची दसरा मेळाव्याची ‘तोफ’ शिवाजी पार्कमध्ये कितीवेळा थंडावलेली?

220

सध्या जस जसा नवरात्रोत्सव जवळ येऊ लागला आहे, तसे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची चर्चा सुरु झाली आहे. याला कारणही तसेच आहे. शिवसेना आणि दसरा मेळावा हे मागील ५ दशकांत घट्ट नातेसंबंध बनले आहे. पण यंदाच्या वर्षी शिवसेनेत उभी फूट पडली आहे. उद्धव गट आणि एकनाथ शिंदे गट! हे दोन्ही गट आता शिवसेनेवर दावा सांगत असून हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. त्याचा न्यायनिवाडा यथावकाश होईलच. मात्र या दावा-प्रति दाव्याच्या खेळातून शिवसेनेचा दसरा मेळावाही सुटलेला नाही. हा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अर्थात शिवाजी पार्क येथे घेणार असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाने केला आहे, तर शिवसेना आमचीच असून आम्हीच मेळावा घेणार आहोत, असा दावा एकनाथ शिंदे गटाने केला आहे. दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क हे एक समीकरण बनले आहे. म्हणूनच यंदाच्या वर्षी दसरा मेळावा कोणत्या गटाचा होणार आणि तो शिवाजी पार्कवरच होईल का, असा प्रश्न सध्या जोरदार चर्चेला आला आहे. मात्र शिवसेनेच्या ५६ वर्षांच्या इतिहासात ५ वेळा दसरा मेळाव्यासाठी शिवसेना शिवाजी पार्कासाठी वंचित राहिली होती, त्यामुळे यंदाचा वर्षी मेळाव्यासाठी शिवाजी पार्क दोन्ही गटाला मिळाले नाही आणि दसऱ्याच्या दिवशी शिवाजी पार्कात शुकशुकाट पहायला मिळाला, तरी तो काही पहिलाच प्रसंग नसणार आहे.

(हेही वाचा गोव्यात ‘ऑपरेशन लोटस’ नंतर सुरू झाला #BikGayiCongress ट्विटर ट्रेंड)

दसरा मेळावा कधीपासून सुरु झाला?

महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे स्थान हे अनन्य साधारण आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून राज्यभरातील शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी आवर्जून शिवतीर्थावर अर्थात शिवाजी पार्कात येतात. १९ जून १९६६ रोजी दादरमध्ये शिवसेनेची स्थापना झाली. त्याच्या दुसऱ्या वर्षापासूनच बाळासाहेब ठाकरे यांनी शिवतीर्थावर सुरु केलेली दसरा मेळाव्याची परंपरा आजतागयात कायम होती. ५६ वर्षे ही परंपरा सुरूच आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे दसरा मेळाव्याचे भाषण हे शिवसैनिक आणि राजकीय वर्तुळासाठी एक प्रकारची पर्वणी असायची. दसरा मेळाव्याच्या भाषणांमधून बाळासाहेब ठाकरे हे राज्यभरातील शिवसैनिकांना वर्षभरासाठी कार्यक्रम देत असत. त्यानुसार शिवसैनिक पुढील वर्षभर कामाला लागायचे. दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क ही परंपरा मात्र शिवसेनेच्या इतिहासात आजवर ५ वेळा खंडीत झाली आहे. २००६ साली पावसामुळे शिवाजी पार्कात चिखलाचे साम्राज्य झाले होते, त्यामुळे मेळावा इथे होऊ शकला नाही. २००९ आणि २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने दोन्ही वर्षी दसरा मेळावा होऊ शकला नाही. तर २०२० साली कोरोनामुळे दसरा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सभागृहात घ्यावा लागला होता, तर २०२१ मध्येही  कोरोनामुळेच हा मेळावा षण्मुखानंद येथे झाला होता.

(हेही वाचा अस्मा खान निघाल्या ‘कृष्णा हिंग’च्या मालकीण, संबंध ‘टेरर फंडिंग’शी)

आताच शिवतीर्थाचा अट्टाहास का? 

अशा प्रकारे शिवसेनेच्या इतिहासात ५ वेळा दसरा मेळावा आणि शिवतीर्थ अशी परंपरा खंडीत झालेली असताना यंदाच्या वर्षीच शिवतीर्थासाठी खटाटोप का सुरु आहे? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. याचे उत्तर सत्तासंघर्षामध्ये दडले आहे. नोव्हेंबर २०१९मध्ये शिवसेनेने दोन्ही काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले, पण मुख्यमंत्री म्हणून त्यांना शिवतीर्थावर हजारोंच्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांना दसरा मेळाव्यात संबोधित करण्याचे भाग्य लाभले नाही. कारण २०२० आणि २०२१ हे दोन्ही वर्षी कोरोनामुळे मेळावा शिवतीर्थावर झाला नाही आणि २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार फोडून भाजपसोबत सत्ता स्थापन करत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून हटवले आणि शिवसेनेवरही त्यांनी दावा केला आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आपलीच असल्याचा दावा करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयीन पातळीवर जरी हा विषय अडकला असला तरी भावनिक पातळीवर या विषयाचा निवाडा करण्यासाठी उद्धव आणि शिंदे गट दोघे जण इरेला पेटले आहेत. जो कोणता गट शिवाजी पार्कात दसरा मेळावा घेईल, त्याचे शिवसैनिकांच्या मनात पारडे जड बनले, हे पक्के ठाऊक असल्याने उद्धव गटाने दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे म्हणून गणेशोत्सव काळातच महापालिकेकडे परवानगीसाठी अर्ज केला आहे. तर महापालिकेने हा अर्ज अजून निकालात काढला नाही, परंतु दुसरीकडे शिंदे गटाने बीकेसी येथील मैदान आरक्षित करून ठेवले आहे. त्यामुळे कदाचित दसऱ्याच्या दिवशी दोन्ही गटाला शिवाजी पार्क मिळाले नाही, तरी शिंदे गटाला बीकेसीत दसरा मेळावा घ्यायला मिळावा, अशी व्यूहरचना शिंदे सरकारने आखली असावी, अशी चर्चा आहे. मात्र यामुळे दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना आपट्याची पाने देऊन शुभेच्छा द्यायच्या ऐवजी शिंदे-ठाकरे गटाने एकमेकांना आपटण्याचा कार्यक्रम केला नाही तर मिळवले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.