आम्हाला ते मिंधे म्हणतात. पण, लोकांच्या पुढे वाकण्यात यांची जिंदगी गेली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर ते कायम झुकले. त्यामुळे उद्धव यांनी ‘ठाकरे’ नव्हे, ‘वाकडे’ आडनाव लावावे, अशी कडवट टीका शिवसेना प्रवक्या ज्योती वाघमारे यांनी केली. (Shivsena Dasara Melava)
आझाद मैदानावर आयोजित शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना वाघमारे म्हणाले, आम्हाला मिंधे म्हणताय? मग अडीच वर्षे घरात बसून तुम्ही काय धंदे केलेत? ज्या बाईने बाळासाहेबांना थेरडा असे संबोधले, त्याच बाईला उद्धव ठाकरे सन्मान देतात. तुळजाभवानीची चेष्टा करणारी बाई जर यांचा चेहरा असेल, अशा बाईच्या पदराआड राजकारण करत असाल, तर थू यांच्यावर, असा हल्लाबोल त्यांनी केला.
(हेही वाचा – UBT Shivsena Dasara Melava : उद्धव ठाकरे यांच्याकडून घराणेशाहीचे समर्थन; तर भाजपच्या बहुमतावर टोमणे)
आज ५७ वर्षांची परंपरा असणाऱ्या या दसरा मेळाव्याच्या मंचावरून मी प्रश्न विचारते, की मर्द कुणाला म्हणायचं? कोरोना काळात घरात बसणारा की पीपीई किट घालून रुग्णांची भेट घेणारा? अडीच वर्षात अडीच तास मंत्रालयात जाणारा मर्द नसतो, रात्री तीन वाजेपर्यंत काम करणारा मर्द असतो. पेंग्विन आणणारा मर्द नाही, तर अफजलखानाची वाघनखं आणणारा मर्द असतो. बाळासाहेबांच्या विचारांसाठी छाताडावर केसेस घेणारा मर्द असतो. मतांसाठी पावसात भिजणारे भरपूर असतात. पण लोकांच्या मदतीसाठी धावणारा मर्द असतो. अफजल खानाची समाधी उद्ध्वस्त करणारा मर्द असतो. एकनाथ शिंदे यांनी महिलांना सन्मान देणारी बाळासाहेब ठाकरेंची महिला आघाडी उभी केली, महिलांना सन्मान दिला. हे आम्हाला मिंधे म्हणतात, गद्दार म्हणतात. पण बंडखोरांचा इतिहास लिहिला जातोय, तळवे चाटणाऱ्यांचा नाही, असेही वाघमारे म्हणाल्या.
आम्ही ५० जणांनी इतिहास घडवलाय – गुलाबराव पाटील
आज आम्हाला बरेच लोक गद्दार म्हणत आहेत. अरे आम्हाला गद्दार म्हणता, मग आमच्यासोबत लव्ह मॅरेज करणाऱ्या अजित पवारांना काय म्हणणार? आम्ही ५० जणांनी इतिहास घडवलाय, ज्याची जगाने दखल घेतली. गावामध्ये दसरा कसा होतो, हे आम्ही गेल्या 37-38 वर्षांत पाहिले नाही. सुलभ शौचालयमध्ये अंघोळ करायची, मराठी माणसाकडे वडापाव खायचा आणि संध्याकाळी चार वाजता नवे कपडे घालून शिवतीर्थावर जागा पकडायची, असे आम्ही कार्यकर्ते आहोत, असे भावनिक उद्गार मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरून काढले.