शिंदे-फडणवीस सरकारची जाहिरात झोंबली शिवसेनेला: मार्मिकमधून व्यंगचित्रातून घेतला समाचार

92

गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध शिंदे-फडणवीस सरकारने हटवल्यानंतर मुंबईत ठिकठिकाणी हिंदुंचा सण निर्बंधमुक्त अशाप्रकारची जाहिरात केली. एकप्रकारे सरकारच विघ्नहर्ता असल्याचा संदेश जाहिरातींच्या माध्यमातून दिला जात असतानाच ही जाहिरातच शिवसेनेला आणि पर्यायाने ठाकरेंना झोंबल्याचे पहायला मिळत आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या साप्ताहिक मार्मिकच्या मुखपृष्ठावर गणपती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खांद्यावर घेतलेले उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची चित्रे रेखाटून मी असताना तुम्ही विघ्नहर्ता? आता विसर्जन करू का तुमचं? असे संवाद बाप्पांच्या मुखी घालण्यात आले आहे.

( हेही वाचा : संजय राऊतांचे बंधू अचानक ‘मातोश्री’वर; उद्धव ठाकरेंकडून बोलावणे)

मागील दोन वर्ष कोविडमुक्त सर्व सण आणि उत्सव मोकळ्याप्रमाणात साजरे करता आले नाही. कोविडचे निर्बंध असल्याने लोकांना उत्सवात जास्त सहभागी होता येत नव्हते. परंतु आता कोविड संकट टळल्याने राज्यात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने यंदा सणांवरील सर्व निर्बध काढून निर्बंधमुक्त असे सण साजरा करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे या सरकारच्यावतीने हिंदुंचे सणांवरील विघ्न दूर अशाप्रकारची बॅनरबाजी मुंबईभर करण्यात आली आहे.

सणांवरील विघ्न दूर झाल्याची जाहिरात ही ठाकरेंच्या जिव्हारी

या जाहिरातीमुळे शिवसेना आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंना मिरच्या झोंबल्याचे पहायला मिळत आहे. शिवसेनेचे पाक्षिक असलेल्या मार्मिकच्या मुखपृष्ठावर गणपतीचे एक व्यंगचित्र काढण्यात आले आहे. गणपती नदी किनारी उभे असून त्यांच्या पायाखाली लाकडी फळी आहे. या फळीवर गणपतीचा बाप्पांचा एक पाय दाखवला आहे. तर फळीचा निम्म्यापेक्षा भाग हा नदीच्या पाण्याच्या भागावर आहे. त्या फळीच्या दुसऱ्या टोकाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या खांद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेऊन असल्याचे दाखवले आहे. तर गणपतीच्या मुखी‘ मी असताना तुम्ही विघ्नहर्ता? आता विसर्जन करू का तुमचं?’असा संवाद दाखवला आहे. त्यामुळे सरकारने यंदा निर्बंधमुक्त सण साजरे करायला दिलेली मुभा आणि सणांवरील विघ्न दूर झाल्याची जाहिरात ही ठाकरेंच्या जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मार्मिकमधून व्यंगचित्रातून त्यांनी शिंदे व फडणवीस यांच्यावर टीका करत त्यांचा समाचार घेतला आहे.

मार्मिकमधून शिवसेनेने घेतलेल्या समाचारानंतर राज्याचे माजी छगन भूजबळ यांनीही सरकारचा समाचार घेतला आहे. छगन भुजबळ म्हणाले, नवीन व्याखेप्रमाणे गणपती बाप्पा विघ्नहर्ता नाही. हे नवे सरकारच विघ्नहर्ता आहे,अशी त्यांनी जाहिरात केली आहे. ते म्हणतात त्यांचे सरकार आले आणि हिंदु सणांवरील विघ्न कमी झाले. त्यामुळे या विघ्नहर्त्यांपेक्षा ते विघ्नहर्ता झाले आहेत, अशा शब्दांत टिका केली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.