अंधेरी पोटनिवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या गटाने उमेदवार दिलेला नाही. मग ते चिन्ह का मागत आहेत, असा सवाल उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगासमोर उपस्थित केला आहे. शिवाय धनुष्यबाण चिन्हाबाबत तातडीने सुनावणी घेण्यासारखी सध्या स्थिती नाही, असेही ठाकरे गटाने म्हटले आहे.
शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटातील निवडणूक चिन्हाचा वाद आता निवडणूक आयोगासमोर आला आहे. दोन्ही गटाकडून दावे-प्रतिदावे केले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अद्याप उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावर दावा केलेला नाही. त्यामुळे चिन्हाबाबतचा दावा पक्षप्रमुखांच्या परवानगीविना पूर्ण होऊ शकत नाही, असे ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.
उद्धव गटाकडे दहा लाखांपेक्षा अधिक प्राथमिक सदस्यांची शपथपत्रे
अडीच लाख पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे व दहा लाखांपेक्षा अधिक प्राथमिक सदस्यांची शपथपत्रे दिल्लीमध्ये तयार आहेत. मात्र, विहित नमुन्यामध्ये ती सादर करण्यासाठी आम्हाला चार आठवड्यांचा वेळ मिळावा. जर निवडणूक आयोगाला ती आत्ता आहे त्या स्थितीत हवी असतील, तर तीही आम्ही सादर करू, असेही ठाकरे गटातर्फे आयोगाला कळविण्यात आले आहे.
(हेही वाचा राहुल गांधींनी पुन्हा ओकली गरळ, वीर सावरकरांचा अवमान, उद्धव ठाकरे निषेध करणार का, फडणवीसांचा सवाल!)
पक्षप्रमुख पदाला आव्हान नाही
उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाला आव्हान न दिल्याची बाब शिंदे यांनीही आपल्या याचिकेतून मान्य केली आहे. त्यांनी स्वतःला मुख्य नेता पदावर नेमले आहे. मात्र, अशा पद्धतीचे कुठलेही पद शिवसेनेच्या घटनेत नाही, असा दावा ठाकरे यांच्याकडून आयोगासमोर करण्यात आला आहे.
२०२३ पर्यंत उद्धव ठाकरे पक्षप्रमुख
निवडणूक आयोगाकडे सर्व प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत. आम्ही सादर केलेल्या सर्व प्रति या सत्य आहे. शिवसेना कुणाची, तर ती शिवसैनिकांची आहे. आमदार, खासदार कोण, सामान्य शिवसैनिकांनी मतदान केले म्हणून आम्ही निवडून आलो आहोत. पक्ष पहिला आहे. पक्षाला ते चिन्ह मिळालेले आहे. शिवसेना हा नोंदणीकृत पक्ष आहे. त्यामुळे मान्यता प्राप्त पक्षात जी निवड होते, ती पक्ष प्रमुख करतात. नुकतीच राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती. त्यात २०२३ पर्यंत पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी निवड करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
Join Our WhatsApp Community