दसरा मेळावा यंदाही ऑनलाईन की शिवाजी पार्कात? वाचा सविस्तर बातमी

यावेळी दसरा मेळावा कसा साजरा होणार याची उत्सुकता शिवसैनिकांना लागली असताना, आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महत्वाचे विधान केले आहे.

142

दसरा मेळावा… शिवसैनिकांसाठी एक उत्सव. दसऱ्याला शिवसैनिक मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर विचारांचे सोने लुटण्यासाठी येत असतात. मात्र गेल्यावर्षी कोरोनामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने साजरा झाला होता. यावेळी दसरा मेळावा कसा साजरा होणार याची उत्सुकता शिवसैनिकांना लागली असताना, आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महत्वाचे विधान केले आहे. यंदाच्या वर्षी ऑनलाईन पद्धतीने मेळावा होणार नसून, प्रत्यक्ष मेळावा घेण्यावर चर्चा सुरू आहे. याबाबत अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

काय म्हणाले राऊत?

कोरोनाचं संकट जरासे ओसरू लागल्याने यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने पार पडणार नाही. तो नियम आणि संकेत पाळून कशा पद्धतीने साजरा करता येईल, याचे नियोजन सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचीही तशी इच्छा आहे, असे सांगत शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार असल्याचे संकेतच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत.

(हेही वाचाः धुळ्यात भाजपाचे वर्चस्व कायम! बहुमत राखण्यात यश)

ठाकरे कुटुंबीय आणि शिवतीर्थ यांच्यातील नाते

ठाकरे कुटुंबाचा शिवतीर्थाशी जवळचा संबंध आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी पहिला मेळावा २७ नोव्हेंबर १९६६ रोजी शिवाजी पार्क येथे घेतला होता. तेव्हापासून आजतागायत याच मैदानावर सेनेचा दसरा मेळावा होत आला आहे. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्या हाती सोपवले आणि नातू आदित्य ठाकरे यांना सेनेची जबाबदारी दिली, त्याचे हे मैदानही साक्षीदार आहे. त्याचबरोबर १९९५ मध्ये जेव्हा शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री झाला तेव्हा त्यांचा शपथविधीही याच मैदानात झाला होता. त्यानंतर जेव्हा स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा देखील त्यांनीही याच मैदानात शिवसैनिकांच्या उपस्थितीत शपथ घेतली.

दसरा मेळाव्याला असे आले सांस्कृतिक स्वरुप

२०१५ साली एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने या मैदानात कोणत्याही राजकीय पक्षांच्या सभांना परवानगी न देण्याचा आदेश दिला. या सभांमुळे येथे ध्वनी प्रदूषण होते आणि हा परिसर शांतता क्षेत्रात येतो, असा युक्तिवाद करण्यात आला होता. तेव्हा शिवसेनेकडून या सभेत ६० डिग्रीपेक्षा अधिक आवाज केला जाणार नाही असा युक्तिवाद करण्यात आला. त्यावेळी उच्च न्यायालयाने यंदाच्या वर्षी सभा घ्या. मात्र पुढच्या वर्षी पर्यायी व्यवस्था करावी लागेल, असे सांगण्यात आले होते. मात्र राज्यात युतीचे सरकार होते. त्यामुळे दसरा मेळाव्याला राजकीय सभेऐवजी सांस्कृतिक स्वरुप देण्यात आले.

(हेही वाचाः तळीये गावाच्या पुनर्वसनाचा मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी मिळणार पक्की घरे)

बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ

ठाकरे कुटुंबाच्या आनंदाचे हे मैदान जसे साक्षीदार बनले, तसे २०१२ साली शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर दुःखाचेही साक्षीदार बनले होते. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर याच मैदानात अंतिम संस्कार करण्यात आले आणि त्यावेळी लाखोंच्या संख्येने शिवसैनिक या मैदानात जमले होते. बाळासाहेबांची आठवण म्हणून याचठिकाणी स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ देखील उभारण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.