शिवसेनेच्या इतिहासात ढाल-तलवार चिन्हाचे काय आहे महत्व?

149

शिवसेनेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोन गट पडले आहेत. दोन भाग पडलेली शिवसेना प्रथमच अंधेरी (पू.) विधानसभा पोट निवडणुकीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहे. यासाठी उद्धव गटाला मशाल चिन्ह मिळाले आहे, तर शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह मिळाले आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या इतिहासात शिवसेना मशाल चिन्हावरही निवडणूक लढली होती, तसेच ढाल-तलवार या चिन्हाद्वारेही निवडणूक लढली होती.

१९६८च्या निवडणुकीत चिन्ह होते ढाल-तलवार  

१९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या झंझावाताला सुरुवात झाली. मराठी माणसांच्या न्याय-हक्कांसाठी लढणारी संघटना, एवढ्यापुरतेच शिवसेनेचे उद्दिष्ट सुरुवातीला होते. मात्र पुढच्याच वर्षी शिवसेना निवडणुकीच्या राजकारणात उतरली आणि १९६७ मध्ये शिवसेनेने ठाणे नगरपालिकेची निवडणूक लढवली. तसेच १९६८ मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक मैदानातही बाळासाहेबांनी आपले उमेदवार उतरवले. या निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिलेदारांचे चिन्ह होते ढाल-तलवार. शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकसभा आणि विधानसभेच्याही निवडणुका विविध चिन्हांवर लढवल्या. बाळासाहेबांच्या आक्रमक भाषणांनी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर होणाऱ्या उग्र आंदोलनांनी शिवसेनेची पाळेमुळे हळूहळू राज्यभर खोलवर रुजू लागली. याचाच परिपाक असा झाली की, अखेर निवडणूक आयोगाने शिवसेनेला १९८९ मध्ये नोंदणीकृत पक्षाची मान्यता दिली. त्यानंतर शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्हही देण्यात आले.

(हेही वाचा शिंदेंच्या ‘उठावा’ला मिळाली ‘ढाल-तलवारी’ची साथ)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.