राणीबागेतील पेंग्विन पक्षी आणि पेंग्विन कक्ष यांच्या देखभालीसाठी खासगी कंत्राटदारांकडून देखभाल न करता आपल्याच कर्मचाऱ्यांकडून देखभाली केली जावी, अशी मागणी करणाऱ्या विरोधी पक्षाचा सूर आता बदला असून याबाबतच्या प्रस्ताव मंजुरीला शिवसेनेला त्यांनी साथ दिली. कोणत्याही प्रकारे चर्चा करू न देता हा प्रस्ताव मंजूर केल्याने भाजपने याचा तीव्र निषेध केला आहे. पेंग्विनच्या माध्यमातून कंत्राटदाराच्या घशात पैसा टाकण्यासाठी आणि पेंग्विन गॅंगला पोसण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा वायफळ खर्च सत्ताधारी करत असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे स्थायी समिती सदस्य विनोद मिश्रा यांनी केली आहे.
१५ कोटी ८७ लाखांचा खर्च होणार
वीर जिजामाता भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात (राणीबाग) पेंग्विन कक्ष उभारण्यात आल्या नंतर त्याच्या पुढील देखभाल व दुरुस्ती करता यापूर्वी नेमण्यात आलेल्या कंत्राटदाराचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर पुढील तीन वर्षांकरता नवीन कंत्राटदाराची नेमणूक करण्यासाठी मागवलेल्या निविदेचा पात्र ठरलेल्या कंपनीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. परंतु ज्या कामासाठी यापूर्वी तीन वर्षांकरता ११ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. तिथे पुढील तीन वर्षांकरता १५ कोटी ८७ लाखांचा खर्च होणार आहे. ज्या हाय वे कंपनीने पूर्वी ११ कोटी रुपयांमध्ये देखभालीचे काम केले होते, त्याच कंपनीने पुढील तीन वर्षांकरता सुमारे चार कोटींची अधिकची बोली लावून काम मिळवले आहे.
(हेही वाचा दोन वर्षांनंतर पेडणेकरांना महापौर निधीची झाली आठवण)
घाईघाईत प्रस्ताव मंजूर
मात्र, भाजपने याला पहिल्यापासूनच विरोध दर्शवला होता. पण त्याबरोबरच काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी या कंत्राट कामाला विरोध करत हे काम आपल्याच कर्मचाऱ्यांमार्फत केले जावे, असे स्पष्ट केले होते. पण जेव्हा हा प्रस्ताव मंजुरीला आला असता समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी घाईघाईत हा प्रस्ताव पुकारून मंजूर केला. याबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष आदींच्या एकाही नगरसेवकाने हरकत घेतली नाही आणि भाजपच्या सदस्यांनी मागणी करूनही त्यांना बोलण्याची किंवा त्यावर चर्चा करण्याची संधी दिली नाही. त्यामुळे भाजपच्या सदस्यांनी काळे फलक दाखवून अध्यक्षांचा तीव्र निषेध केला.
काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदारालाच कंत्राट
याबाबत बोलतांना भाजपचे महापालिका पक्षनेते विनोद मिश्रा यांनी सद्यस्थितीत पेंग्विनच्या देखभालीसाठी शिफारस करण्यात आलेल्या कंत्राटदाराला २०१६ मध्ये पेंग्विनच्या मृत्यूबद्दल काळ्या यादीत टाकले होते आणि निकृष्ट कामासाठी त्याच्याकडून १.४ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. अशा भ्रष्ट कंत्राटदाराला पुन्हा या प्रक्रियेत सामावून घेणे अनाकलनीय असल्याची टीका मिश्रा यांनी केली. सध्याचा पेंग्विन देखभालीचा खर्च प्रति दिन १,०६,६१३ एवढा असून त्याच कंत्राटदाराला सध्याच्या देखभाली खर्चापेक्षा ३० टक्के वाढीव खर्च (१,३९,३८२ प्रतिदिन) देण्याचा घाट महापालिकेने घातला असून ही सरळसरळ जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे. प्राणिसंग्रहालयाची कमाई कमी आणि खर्च अधिक असताना कायद्याचे उल्लंघन करून असे प्रस्ताव कसे काय मंजूर केले जातात, हे अद्यापही समजू शकलेले नाही, असे सांगितले.
Join Our WhatsApp Community