पुण्यातील पत्रकार परिषदेत भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हिंदू व्होट बॅंक संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केली आणि त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वाजपेयी यांनी कळस चढवला, असे मत व्यक्त केले. एकीकडे भाजप नेते या विधानाचे समर्थन करत आहेत, तर दुसरीकडे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. यासंदर्भात संजय राऊत यांनी हिंदू व्होट बॅंक हा मुद्दा शिवसेनेने सर्वप्रथम मांडला, असे वक्तव्य केल्यावर प्रविण दरेकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले राऊत ?
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदू व्होट बँकेचा मुद्दा सर्वप्रथम मांडला होता. त्यांनी हिंदुत्व रूजवले. बाबरीचे पतन होत असताना शिवसेनाप्रमुख ठामपणे हिंदूंच्या मागे उभे राहिले. यामुळे संपूर्ण देशभरात बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुह्रदयसम्राट असा नावलौकिक मिळाला, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. चंद्रकांत पाटील काय म्हणतात? त्यावर भूमिका ठरत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली की नाही, ते मला माहीत नाही. पण त्यांनी या देशात पहिलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचाच विचार हा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यापूर्वी वीर सावकर यांनी महाराष्ट्रात रुजवला, असेही राऊत म्हणाले.
( हेही वाचा : “मी हिंदू आहे” म्हणतात राहुल गांधी! मोदींमुळे झाली उपरती, पण… )
दरेकरांचा शिवसेनेवर निशाणा
संजय राऊत यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले, हिंदुत्वाची प्रखर जाणीव नक्कीच बाळासाहेब ठाकरेंनी मिळवून दिली. हिंदुह्रदयसम्राट म्हणून देशभरात त्यांना नावलौकिक मिळाला यात दुमत असण्याचं कारण नाही. पण यांनी आता ज्यांनी हिंदुत्ववादी विचारधारेला विरोध केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्ता स्थापन केली. म्हणून हिंदुत्वाविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार यांनी गमावला आहे असा खोचक सल्ला देत प्रविण दरेकरांनी संजय राऊत तसेच शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
Join Our WhatsApp Community