संजय राऊत यांना नटसम्राटमध्ये भूमिका दिली पाहिजे. कारण ती भूमिका ते उत्तम वठवू शकतात. हे तेच संजय राऊत आहेत ज्यावेळी मनोहर पर्रीकर आजारी होते नाकामध्ये नळी असताना विधानसभेत बजेट मांडले, त्यावेळी याच संजय राऊत यांनी हे म्हटलं होते की, गोव्यातले ‘सरकारही सिक आणि मुख्यमंत्रीही सिक’ असे सरकार चालवणे किती अयोग्य आहे. शिव्यांची लाखोली वाहिली आणि तेच संजय राऊत आता उत्पल पर्रीकरसाठी मगरीचे अश्रू ढाळत आहेत. अरे जेव्हा मनोहरभाई जिवंत होते त्यावेळी तुमची काय भूमिका होती? आज तुम्ही काय बोलत आहात ती पूर्ण देशाने पाहिले आहे, असा खोचक सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना केला.
एवढी वर्ष शिवसेनेला डिपॉझिट वाचवता आले नाही…
काँग्रेसला हे माहीत आहे की शिवसेनेला सोबत घेतले तर त्यांचा गोव्यातील अल्पसंख्यांक समाजाचा बेस आहे त्यावर प्रतिकूल परिणाम होईल. कॉंग्रेसने तोंडावर शिवसेनेला सांगितले की, आम्ही तुम्हाला सोबत घेऊ शकत नाही. संजय राऊत आता काहीही मुलामा देत असले तरी त्याला काही अर्थ नाही. शिवसेनेला काँग्रेसने गोव्यात अक्षरशः झिडकारले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना गोव्यात एकत्र निवडणूक लढवत आहेत त्याने काय फरक पडणार आहे? शिवसेना इतकी वर्षे गोव्यात निवडणूक लढवते आहे, त्यांना डिपॉझिट नाही वाचवता आले. उद्या असेही भक्त काही म्हणू शकतात की अमेरिकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस रंग दाखवू शकतात! असा टोला फडणवीसांनी शिवसेनेला लगावला आहे.
कार्यकर्ते समजूतदार, फार बंड होणार नाही
गोव्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. लोकसंख्या आणि विधानसभा सदस्यांच्या दृष्टीने सर्वात छोटं राज्य असलेल्या गोव्यात यावेळी भाजपा आणि काँग्रेस, मगोप या पारंपरिक प्रमुख पक्षांसोबतच आप, तृणमूल काँग्रेस हे पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने निवडणुकीची चुरस वाढताना दिसत आहे. दरम्यान मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर भाजप सोडणार?, अशी चर्चा गोव्यातील राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहेत. यावर देवेंद्र फडणवीस यांनी आमचे कार्यकर्ते समजूतदार आहेत, फार बंड होईल, असे वाटत नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे. इच्छुक उमेदवारांना माहीत आहे की, भाजपच सत्तेवर येतो. जेव्हा खात्री असते की, पक्ष सत्तेवर येणार तेव्हा इच्छुकांची संख्या देखील वाढते. इच्छुकांची संख्या वाढणे ही चांगली गोष्ट आहे, असेही त्यांनी सांगितले.
उत्पल यांना पक्षात मोठे राजकीय भवितव्य
उत्पल पर्रीकर यांच्याबाबतीत आमचे राष्ट्रीय नेते निर्णय घेतील. आम्ही आधीच स्पष्ट केले आहे की, मनोहर भाई पर्रीकर हे आमचे ज्येष्ठ नेते होते. त्यांचा परिवार आम्हाला आमचा परिवार वाटतो. पक्षाची एक शिस्त असते. उत्पल यांना पक्षात मोठे राजकीय भवितव्य आहे. उत्पल पर्रीकर यांना माझ्या विधानाचा अर्धवट भाग दाखवून प्रश्न विचारण्यात आला. त्या बिचाऱ्याने त्यामुळे तसं विधान केले. त्याबाबत मी काही नाराज नाही. मी स्पष्ट सांगितलं होतं की कुणाचा मुलगा आहे म्हणून कोणाला उमेदवारी मिळत नाही. त्यांच्यात मेरिट असलं पाहिजे, त्यांनी काम केले पाहिजे, त्याच आधारावर तिकीट मिळते, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
( हेही वाचा : पटोले अडचणीत! मोदींना मारण्याची भाषा भोवली )
ममतादीदींना गोव्यात पाठिंबा मिळणार नाही
मला वाटत नाही तृणमूल काँग्रेसला इथे लोकांनी स्वीकारलं आहे. तृणमूल काँग्रेसचा आलेख खाली आला आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांनंतर जो हिंसाचार झाला आणि हिंदूंना तिथे टार्गेट केले गेले. त्यावेळी ममतादीदी शांत राहिल्या, सर्वोच्च न्यायालयाला कारवाई करावी लागली. लोक हे विसरणार नाही. केजरीवाल यांनी दिल्लीत जे सांगितले ते केले नाही, त्यामुळे गोव्यातही लोक त्यांना पाठिंबा देणार नाहीत, असे स्पष्ट करत गोव्यात भाजपचे वर्चस्व आहे, हे फडणवीसांनी नमूद केले आहे.
Join Our WhatsApp Community