छोट्या पक्षांनी कोंडी केल्याने शिवसेनेची दमछाक; पवार, महाडिकांचे भवितव्य अपक्षांच्या हाती

97

राज्यसभेच्या ६ जागांसाठीच्या निवडणुकीला चार दिवस उरले आहेत, त्याआधी सोमवारी, ६ जून २०२२ रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक घेतली, त्यानंतर सगळ्या आमदारांची रवानगी हॉटेल रिट्रीट येथे करण्यात आली, तर काँग्रेस-राष्ट्रवादीदेखील त्यांचे आमदार हॉटेल ट्रायडेंट येथे पाठवणार आहे. मात्र आता छोटे पक्ष आणि अपक्ष आमदार या संधीचा फायदा घेऊ लागले आहेत. पाठिंब्याच्या बदल्यात महाविकास आघाडीकडे ते विविध मागण्या करू लागले आहेत. त्यामुळे एक प्रकारे शिवसेनेची कोंडी करत आहेत.

अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न

सध्या राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार संजय पवार यांना निवडून आणणे हे शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचे बनले आहे, कारण भाजपने संजय पवार यांचा पराभव करणार असल्याचे ठासून सांगितले आहे, त्यामुळे या निवडणुकीत आमदारांच्या मतांची फोडाफोडी होईल, अशी शक्यता आहे.  म्हणून आता शिवसेना आणि भाजप हे अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांना गळाला लावण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. मात्र आता याचा फायदा आपसूकच अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षांचे आमदार घेत आहेत.

(हेही वाचा Traffic problem in Mahabaleshwar : महाबळेश्वर होणार इको हिल स्टेशन! खासगी वाहनांवर येणार बंदी?)

कोण कशी कोंडी करत आहेत? 

  • शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आघाडीतील घटक पक्ष असलेल्या मंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने सरकारला घेरले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून धान खरेदी सुरू करावी. अन्यथा आम्ही राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाबाबतचा निर्णय शेवटच्या पाच मिनिटांमध्ये घेऊ, असे सांगून खळबळ उडवून दिली आहे.
  • बहुजन विकास आघाडीकडे ३ मते आहेत, या पक्षाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी राज्यसभा निवडणुकीत उभ्या असणाऱ्या उमेदवारांनी किंवा राजकीय पक्षांनी माझी तीन मते गृहीत धरू नये, असे ठणकावून सांगितले आहे. वसई-विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पक्षांनी आपल्याला सहकार्य करावे, अशी अट घातली आहे.
  • अपक्ष उमेदवार आशिष जयस्वाल यांनी निधीवाटप आणि मंत्र्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. सरकारमधील मंत्री मतदारसंघातील कामासाठी टक्केवारी मागत आहेत, असा खळबळजनक आरोप केला आहे.
  • समाजवादी पक्षाची २ मते आहेत. समाजवादी पक्षाने अल्पसंख्याक विकास आणि मुस्लीम आरक्षणाच्या मुद्दयावर सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. राज्यसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
  • एमआयएम आणि मनसेने त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.