पटियालात तणावपूर्ण परिस्थिती; तलवारी नाचवलेल्या गोंधळानंतर शिवसेना नेत्याला अटक आणि …

183

पंजाबमधील पटियालामध्ये गेल्या २४ तासांपासून तणावपूर्ण परिस्थिती आहे. पटियाला भागात शुक्रवारी शिवसेना आणि शीख संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. तलवारींसह दगडानेही दोन गटांनी एकमेकांवर हल्ला चढवला. हा हल्ल्यात एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला होता. दरम्यान या प्रकरणी शिवसेना नेते हरिश सिंगला यांना अटक करण्यात आली आहे.

शिवसेना नेते हरीश सिंगला यांना अटक

पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा शिवसेना नेते हरीश सिंगला यांना अटक केली. सिंगला या खलिस्तानविरोधी मोर्चाचे नेतृत्व करत होते. शिवसेनेनेही त्यांची हकालपट्टी केली आहे. सायंकाळी उशिरा सिंगला हे काली माता मंदिरात हिंदू संघटनांच्या बैठकीला पोहोचले असता तेथे त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्या कारचीही तोडफोड करण्यात आली. सिंगला यांच्या मुलालाही लोकांनी मारहाण केली आहे.

(हेही वाचा – राणा दाम्पत्याला दणका! न्यायालय म्हणतंय, तुरुंगातलंच जेवण करा!)

मोबाईल इंटरनेट सेवा संध्याकाळी 6 पर्यंत बंद

पंजाब सरकारच्या गृह विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पटियालामधील मोबाईल इंटरनेट सेवा शनिवारी सकाळी 9.30 ते संध्याकाळी 6 या वेळेत तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, खलिस्तानविरोधी मोर्चादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर हिंदू संघटनांनी शनिवारी पटियाला बंदची हाक दिली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी काली माता मंदिराबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. या हिंसाचारानंतर आज संपूर्ण पंजाबमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

पटियालामध्ये रात्रभर कर्फ्यू

पटियाला हिंसाचारावरील राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने भगवंत मान सरकारकडून अहवाल मागवला आहे. पटियालामध्ये रात्रभर कर्फ्यू होता. शुक्रवारी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मुख्य सचिव अनिरुद्ध तिवारी आणि पोलीस महासंचालक व्हीके भवरा यांच्यासह उच्च अधिकाऱ्यांशी पटियाला येथील परिस्थितीवर चर्चा केली. त्यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले. खलिस्तानविरोधी मोर्चाची माहिती मिळताच शीख संघटना संतापल्या. एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. परिस्थिती इतकी बिघडली की एक एसएचओ जखमी झाला. यानंतर पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. सायंकाळी उशिरा जिल्हाधिकाऱ्यांनी सायंकाळी ७ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.