एनसीबीने कारवाई करत मुंबई ड्रग्स प्रकरणी अटक केलेल्या आर्यन खानची देशभर चर्चा आहे. या प्रकरणाला राजकीय रंग मिळत असून आर्यन खानच्या सुटकेसाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. आता आर्यन खानच्या संरक्षणासाठी राज्यातील सत्ताधारी शिवसेनेने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. इतकंच नाही तर एनसीबीच्या भूमिकेच्या चौकशीची मागणीही शिवसेनेने केली आहे.
सर्वोच्च न्यायालयात याचिका
शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन व्ही रमण यांच्याकडे या प्रकरणी प्राधान्याने हस्तक्षेप करण्याचा आग्रह केला आहे. राज्य घटनेच्या कलम 32 नुसार तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, आर्यन खानच्या मुलभूत हक्कांच्या उल्लंघनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
(हेही वाचाः “मी चांगला माणूस बनवून दाखवेन…” आर्यन खानने दिला शब्द)
मुलभूत हक्कांचे उल्लंघन
गेल्या दोन वर्षांपासून एनसीबीकडून पक्षपात करण्यात येत असून, फिल्म स्टार्स, मॉडेल आणि सेलिब्रिटींना त्रास देण्यात येत आहे. विशेष एनडीपीएस न्यायालयाद्वारे आर्यन खान आणि इतर आरोपींच्या जामिनावरील निर्णय सार्वजनिक सुट्ट्यांचा हवाला देत 20 ऑक्टोबरपर्यंत टाळणे हा आरोपींचा मोठा अपमान आहे. आर्यन खानला बेकायदेशीररित्या 17 रात्र कारागृहात ठेवणे हे राज्यघटनेतील जीवन आणि स्वातंत्र्याच्या मुलभूत हक्कांचे उल्लंघन असल्याचे सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाला मुलभूत हक्कांच्या उल्लंघनाबाबत कलम 32 नुसार या प्रकरणाची दखल घेणे महत्वाचे आहे.
Join Our WhatsApp Community