मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौ-याची तारीख जाहीर केल्यानंतर त्यांच्या या दौ-याला भाजप खासदारानेच विरोध केला आहे. त्यामुळे आता याला वेगळेच राजकीय वळण मिळाले आहे. त्यातच आता शिवसेना नेत्यांकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या आणि विधान परिषदेच्या उपाध्यक्षा नीलम गो-हे यांनी देखील त्यांच्यावर टीका केली आहे. इतर राजकीय पक्ष राज ठाकरे यांना पाण्यात ढकलून त्यांचा गेम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे गो-हे यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः “राज ठाकरे चुहा है!”, भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान; माफी नाही तर अयोध्येत एन्ट्री नाही)
त्यांना पाण्यात ढकलण्याचा प्रयत्न
इतर राजकीय पक्ष आपल्या फायद्यासाठी राज ठाकरे यांना पाण्यात ढकलत आहेत. पण ते जेव्हा किना-याकडे बघतील, तेव्हा त्यांना शिवसेनेशिवाय दुसरा कोणताही पक्ष दिसणार नाही. कारण बाकीचे पक्ष त्यांचा गेम करण्यासाठी राजकारण करत असल्याचे स्पष्ट मत नीलम गो-हे यांनी व्यक्त केले आहे.
पक्ष वाचवण्याची धडपड
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौ-याला उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी जोरदार विरोध केला आहे. त्यानंतर राज ठाकरे यांच्यावर नीलम गो-हे यांनी टीकास्त्र सोडले आहे. राज ठाकरे यांनी अनेक प्रकारे आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपला ध्वज बदलला, बेळगावचा प्रश्न इतका महत्वाचा नाही असंही ते म्हणाले होते. आता ते पुन्हा हिंदुत्वाकडे वळले आहेत. स्वतःच्या पक्षाला वाचवण्यासाठी माणूस ज्या पद्धतीने हात पाय मारत राहतो, तसं काहीतरी राज ठाकरे करत आहेत, असंही गो-हे म्हणाल्या.
(हेही वाचाः महाराष्ट्रात आडनावं बघून कारवाई केली जाते; आशिष शेलार यांचा शिवसेनेवर घणाघात)