ईडीने राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या निवासस्थानावर गुरूवारी सकाळी साडेसहा वाजेदरम्यान छापा मारला. यावेळी परबांच्या संबंधित सात ठिकाणी छापेमारीची कारवाई केली. त्यानंतर शिवसेनेला आणखी एक धक्का बसला. अनिल परब यांचे निकटवर्तीय संजय कदम यांच्या घरीही ईडीने छापा टाकला आहे.
अनिल परब यांचे निकटवर्तीय संजय कदम हे अंधेरी पश्चिम येथील विधानसभेचे शिवसेना संघटक आहेत. त्यांच्या घरी सकाळपासून ईडीचे अधिकारी दाखल झाले, यानंतर शिवसैनिकांनी तेथे गर्दी करण्यास सुरूवात केली. दरम्यान याअगोदरही अनिल परब यांच्या जवळच्या व्यक्तींच्या घरी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले होते. त्यावेळी कदम यांच्या घरी त्यांना मोठा मुद्देमाल हाती लागला होता. त्यानंतर आता दोन महिन्यांनी ईडीने हा छापा टाकल्याचे सांगितले जात आहे.
(हेही वाचा – “मराठी माणसांच्या टाळूवरचं लोणी खाणारा परब गजाआड जाणार”, रवी राणांचे टीकास्त्र)
मिळालेल्या माहितीनुसार, दोन महिन्यापूर्वी आयकर विभागाकडून संजय कदम यांच्या घरी छापा मारण्यात आला होता. आयकर विभागाने संजय कदम यांच्या घरी दोन दिवस आणि दोन रात्र छापेमारी केली होती. या छापेमारीत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी संजय कदम यांच्या घरातून काही महत्त्वाचे कागदपत्रे जप्त केली होती.
Join Our WhatsApp Community