शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. आता संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर नव्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. सोमय्यांनी 100 कोटींचा टाॅयलेट घोटाळा केला आहे, असे म्हणत राऊतांनी गौप्यस्फोट केला. या घोटाळ्यात त्यांच्या कुटुंबाचाही समावेश असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. हा घोटाळा लवकरच बाहेर काढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विक्रांत घोटाळ्याच्या आरोपीला तुम्ही टाॅयलेट घोटाळ्याबद्दल विचारा असा आरोप राऊतांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना केला आहे.
लवकरच घोटाळा बाहेर काढणार
या महाशयाचा मी टाॅयलेट घोटाळा लवकरच बाहेर काढणार आहे. मीरा भाईंदर महापालिकेचा जो काही कोटींचा टाॅयलेट घोटाळा केला आहे. तो लवकरच बाहेर येणार. सोमय्या युवा प्रतिष्ठान नावाची संस्था चालवत होते. त्यांनी खोटी बिले देऊन पैसे उकळले. पर्यावरणचा -हास झाल्याची कारणं दाखवून हा घोटाळा करण्यात आला आहे. भाजपवाल्यांची राष्ट्रभक्ती फार उचंबळून येत असते. त्यामुळे आता आम्ही काढत असलेल्या टाॅयलेट घोटाळ्यावर भाजपने बोलावे, असा टोलाही राऊतांनी भाजपला लगावला.
( हेही वाचा: लालपरी पुन्हा धावण्यास सज्ज, वाचा ही महत्त्वाची बातमी! )
आधी त्या पैशांचे काय झाले ते सांगा
उद्या दाऊद इब्राहीम जर बसून, राज्यातील घोटाळे बाहेर काढू लागला, तर त्याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. कारण तो आरोपी आहे. तसेच, आयएनएस विक्रांत या घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्या हे आरोपी आहेत त्यामुळे ते येऊन दुस-यावर खोटे आरोप करणार असतील, तर लोक त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. आधी तुम्ही तुमचे हिशोब द्या. विक्रांतसाठी गोळा केलेल्या पैशांचं काय झाले ते सांगा. असे प्रश्न राऊतांनी उपस्थित केले आहेत.
Join Our WhatsApp Community