महाराष्ट्रातला विरोधी पक्ष हा केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करुन अराजकता पसरवत असल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, भविष्यात काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या घरावरही धाडी पडल्या, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नसल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले. तसेच, ईडीच्या धाडी हा चिंतेचा विषय राहिलेला नाही तर आता गंमतीचा विषय झाला आहे. असे वकील सतीश उके यांच्या घरी ईडीने मारलेल्या धाडीबाबत प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले.
तरीही कारवाई केली जात नाही
ज्यांच्याविरोधात माहिती दिली जाते, त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. आम्ही दिलेल्या पुराव्यांवर कोणतीही कारावाई केली नाही. भविष्यात नाना पटोले यांच्या घरावरदेखील ईडीच्या धाडी पडतील यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नसल्याचे राऊत म्हणाले. विरोधी पक्षांच्या विरोधात आम्ही पुरावे दिले असून कारवाई होत नाही. कायदा सर्वांसाठी समान आहे. केंद्रीय यंत्रणाचा वापर करणे हे संघराज्य व्यवस्थेला धोकादायक आहे. जिथे भाजपचे मुख्यमंत्री नाहीत तिथे कायदा समान नसल्याचे दिसून येत आहे.
( हेही वाचा: नाना पटोलेंचे वकील ‘सतीश उके’ यांना ‘ईडी’ने घेतले ताब्यात! )
उके ईडीच्या ताब्यात
दरम्यान, काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या घरी ईडीने धाड टाकली आहे. सतीश उके यांच्या नागपूर इथल्या घरी सकाळपासून तपास यंत्रणांनी झाडाझडती सुरु केली. आता चौकशीसाठी उकेंना ताब्यात घेण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वकील सतीश उके यांनी याचिका दाखल केली होती. त्यावेळी ते बरेच चर्चेत आले होते.
Join Our WhatsApp Community