केंद्रीय तपास यंत्रणा या एका पक्षासाठी काम करत असल्याचे पुनरोच्चार शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काढले आहेत. अयोध्येत पत्रकारांशी संवाद साधताना, त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजप नेतृत्वाकडून गैरवापर सुरु आहे, असा आरोप राऊतांनी केला. राहुल गांधीची नॅशनल हेराॅल्ड प्रकरणात रात्री 12 वाजेपर्यंत चौकशी करणे ही हुकुमशाहीची सुरुवात नाही, तर हुकुमशाहीचे टोक गाठले आहे, असे राऊत यावेळी म्हणाले.
असे काम हिटलरनेदेखील केले नसेल
शिवसेना व इतर पक्षातील नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांकडून त्रास देणे सुरु आहे. हा राजकीय सूड, द्वेष भावनेतून कारवाई केली जात आहे. मुंबईत अनिल परब यांना नोटीस आली आहे. दिल्लीतही मागील तीन दिवस काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांचीदेखील ईडीकडून चौकशी सुरु आहे. असे प्रकार काही दिवस सुरु राहणार असल्याचे त्यांनी म्हटले. ही हुकुमशाहीची सुरुवात आहे, असे मी मानत नाही, पण हुकुमशाहीचे टोक गाठले आहे. आपली सत्ता टिकवण्यासाठी राजकीय विरोधकांना संपवण्याचे असे काम हिटलरनेदेखील केले नसेल.
( हेही वाचा: निखिल भामरेला कारागृहात डांबणे शरद पवारांना आवडेल का? उच्च न्यायालयाचा सवाल )
स्वातंत्र्याची लढाई लढावी लागणार
देशातील लोकशाहीचा डंका जगभरात वाजवला जातो. त्या भारतात लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. हा देशाच्या स्वातंत्र्याचा पराभव असल्याचेही त्यांनी म्हटले. हा पराभव भाजपच्या नेतृत्त्वात सरकारने केला आहे. त्यामुळे आणखी एका स्वातंत्र्याची लढाई लढावी लागणार असल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community