यशवंत जाधव यांच्याकडे प्राप्तिकर विभागाला सापडलेल्या डायरीतील ‘मातोश्री’ या नोंदीमुळे राजकीय वादळ उठले आहे.
या डायरीत मातोश्रीला 2 कोटी आणि 50 लाखांचं घड्याळ दिले असल्याचा उल्लेख आहे. याबाबत आता शिवसेना नेते
संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मातोश्री म्हणजे आई असू शकत नाही का? असा सवाल त्यांनी केला आहे. मी त्यांचं वक्तव्य पाहिलं, त्यांनी आईला दान धर्मासाठी काही पैसे दिले, असं राऊत प्रसारमाध्यमांकडे म्हणाले.
डायरी हा काही पुरावा नाही
शिवसेनेत डायरी वगैरे लिहिण्याची पद्धत नाही. डायरी वगैरे गंमत वाटते. खोटे पुरावे, खोटे गुन्हे दाखल करतात. अशा डायऱ्या विश्वास ठेवण्याच्या लायकीच्या नसतात हे सीबीआयने भाजप नेत्यांची नावं आली तेव्हा सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे. डायरी हा काही पुरावा असू शकत नाही, असं राऊत म्हणाले.
( हेही वाचा: महापालिकेत महापौर नाहीत, पण ओएसडीची नियुक्ती! )
खोटे बोला पण रेटून बोला
पुढे संजय राऊत म्हणाले की, देवाच्या चरणी सर्वांनी खरं बोलायला हवं. तुम्ही जर हिंदुत्व मानत असाल, तर देवाच्या दरबारात आपण किती खरं बोलतो हे काही लोकांनी तपासायला हवं. महाराष्ट्रात षडयंत्र सुरु आहेत, कटकारस्थानं सुरु आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांची बदनामी करणं सुरु आहे. सध्या विरोधी पक्षाचं खोटं बोला पण रेटून बोला ही परंपरा सुरु आहे.
Join Our WhatsApp Community